शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पणजी : म्हादईची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात येण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, तसेच म्हादईचे पाणी वळविले जाते त्या कळसा-भांडुरा प्रकल्पाचे हवाई सर्वेक्षण करावे अशी मागणी म्हादई बचाव शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंन्द्र यादवा यांच्याशी शिष्टमंडळाला भेट घडवून द्यावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने बैठकीत केली आहे. शिष्टमंडळाने केलेल्या सगळ्या मागण्या विचारात घेतल्या जातील, असे अश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. म्हादई बचाव अभियानाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकार यांच्या सोबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी म्हादई बचाव अभियानाच्या निमंत्रक निर्मला सावंत, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर आणि प्रजल साखरदांडे उपस्थित होते. जर सरकाराला हवाई पाहणी करणे जमत नसेल तर शिष्टमंडळ स्वत: प्रकल्प ठिकणी जाऊन पहाणी करील, त्यासाठी सरकारने आम्हाला पोलिस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केरकर यांनी केली. म्हादईचे प्रकरण लवकरात लवकर सुनावणीला घ्यावे अशी मागणी आम्ही न्यायालयासमोर करणार आहोत असे मंत्री सुभाष शिरोडकार यांनी सांगितले. जेव्हा म्हादई प्रकल्पाचा हवाई सर्वेक्षण करण्याचा विषय येणार तेव्हा मुख्यमंत्री कर्नाटक सरकारकडे बोलणी करणार तसेच त्यांना पत्राद्वारे कळविणार असेही ते म्हणाले.









