बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यावर भर द्या
प्रतिनिधी./ बेळगाव
राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन येथील सुवर्णविधानसौधमध्ये भरविण्यात येणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून अधिवेशनाच्या कामांना गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. जिल्हाधिकारी नितेश पाटील व मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मार्गदर्शन केले.
राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन दि. 4 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला राजपत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनाची निश्चित तारीख जाहीर झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाला आवश्यक ती तयारी करणे भाग पडले आहे. जिल्हा प्रशासनाकडून अधिवेशनाच्या तयारीसाठी वेगवेगळ्या समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या समित्यांवर वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार अधिवेशनाला येणाऱ्या मंत्री, आमदार, महनीय व्यक्ती, अधिकारी यांच्या राहण्याची सोय करण्याची महत्त्वाची जबाबदारी असल्याने हॉटेल व्यावसायिकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बोलाविण्यात आली होती.
महनीय व्यक्तींना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची सूचना यावेळी हॉटेल व्यावसायिकांना करण्यात आली. हॉटेलची स्वच्छता, जेवण आदींवर अधिक भर देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. हॉटेलात वास्तव्यास असणाऱ्या महनीय व्यक्तींच्या सोयीनुसार मनुष्यबळ व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली. याबरोबरच वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्याची सूचनाही करण्यात आली. एकूणच बहुतांश महनीय व्यक्ती हॉटेलमध्ये वास्तव्य करणार असल्याने त्याठिकाणी आवश्यक सुविधा पुरविण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली. यावेळी मनपा आरोग्याधिकारी संजय नांद्रे यांच्यासह मनपा कर्मचारी व हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.









