उत्पादन घटणार-काजू उत्पादक आर्थिक संकटात
वार्ताहर/जांबोटी
गेल्या चार-पाच दिवसापासून पहाटेच्या वेळी पडणारे प्रचंड धुके व वातावरणात झालेल्या बदलाचा प्रतिकूल परिणाम काजू पिकाच्या फळधारणेवर झाला असून काजू मोहर करपून गेल्यामुळे काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असल्यामुळे काजू उत्पादक चिंताग्रस्त बनले आहेत. बेळगाव-खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात काजू उत्पादनासाठी कोकणच्या धर्तीवर अनुकूल वातावरण असल्यामुळे या भागात ओसाड माळरानावरील जमिनीत मोठ्या प्रमाणात काजू लागवड करण्यात आली आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यापासून काजू झाडे मोहराने बहरली होती. काजू बियांच्या फळधारणेसाठी पोषक वातावरण असल्यामुळे काही ठिकाणी जानेवारी महिन्यातच काजूच्या फळधारणेला प्रारंभ झाला होता.
शिवाय मागीलवर्षी झालेला मुबलक प्रमाणातील पाऊस व उष्ण वातावरण यामुळे काजू उत्पादनासाठी यावर्षी पोषक वातावरण निर्माण झाले होते. जादा उत्पादन मिळणार असल्यामुळे काजू उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दरवर्षी मार्च महिन्यात काजू उत्पादन ऐन बहरात होते. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण तसेच रात्रीच्या वेळी पडणारे धुके, दव तसेच कधी उष्णता तर कधी थंडीची लाट, आदी नैसर्गिक बदलाचा प्रतिकूल परिणाम काजू उत्पादनावर झाला असून, काजू मोहर पूर्णपणे करपून गेल्यामुळे फळधारणा होऊ शकली नाही. सध्या तुरळक ठिकाणीच काजू उत्पादनाला प्रारंभ झाला आहे. आतापासूनच काजू उत्पादनात घट होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
शासनाने भरपाई द्यावी
गेल्यावर्षी अनुकूल वातावरणामुळे काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळाला होता. परंतु यावर्षी काजूसाठी प्रारंभापासून पोषक वातावरण असल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र यावर्षी देखील काजू उत्पादनाच्या ऐन हंगामातच प्रतिकूल वातावरणामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. यामुळे काजू उत्पादक आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. तरी महसूल व बागायत खात्याने पाहणी करून काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी होत आहे.









