वृत्तसंस्था/ पतियाळा
सध्या पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश तसेच दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा विपरीत परिणाम येथील ऑलिंपिक निवड चाचणीवर झाला आहे. पतियाळात भारतीय शॉटगन नेमबाजांसाठी निवड चाचणी घेतली जात आहे. पण या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या नेमबाजांना या आंदोलनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शेतकरी आंदोलनामुळे शासनाने आंतरराज्य वाहतुकीवर निर्बंध लादल्याने या निवड चाचणीत सहभागी झालेल्या नेमबाजांना निश्चित वेळेत पोहोचण्यास अवघड जात आहे. या नेमबाजी निवड चाचणीत किमान 150 नेमबाज सहभागी झाले आहेत. येत्या जून-जुलै दरम्यान पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा होणार असून या स्पर्धेतील पात्रतेसाठी ही निवड चाचणी घेतली जात आहे. पतियाळातील मोतीबाग गन क्लब प्रांगणामध्ये ही निवड चाचणी घेतली जात आहे.









