वृत्तसंस्था/ मुंबई
येथे सुरू असलेल्या सीसीआय स्नुकर क्लासिक स्पर्धेत भारताचा विश्व विजेता पंकज अडवानी तसेच मुंबई जिमखानाच्या लक्ष्मण रावतने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बेंगळूरच्या पंकज अडवानीने मुंबईच्या नितीश मदनचा 6-4 अशा फ्रेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. अडवानीने आतापर्यंत 27 वेळेला विश्वविजेतेपद मिळविण्याचा पराक्रम केला आहे. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्मण रावतने फुशिंदर सिंगचा 6-5 अशा फ्रेम्समध्ये पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. आता अडवानी आणि रावत यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. अन्य लढतीत कमल चावलाने रेयान रझमीचा 6-4 तर ब्रिटनच्या स्टिफन ली ने विजय निचानीचा 6-1 अशा फ्रेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.









