तुषार धोटे यांची माहिती : प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे मुद्रण दिन साजरा
बेळगाव : प्रिंटिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या स्थानी मोडतो. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित झाले आहे. मोठ्या प्रदर्शनांमधून जगभरात काय सुरू आहे, याची माहिती मिळत असते. त्यामुळे व्यवसायातील बदल जाणून घेण्यासाठी प्रदर्शनांची माहिती घेणे गरजेचे आहे, असे मत भारत प्रिंट एक्स्पोचे प्रतिनिधी तुषार धोटे यांनी व्यक्त केले. बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशन व महाराष्ट्र मुद्रण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जागतिक मुद्रण दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हॉटेल बगीचा येथे झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे दीपक वस्त्रे, बेळगाव प्रेस ओनर्सचे राजेंद्र भातकांडे, संतोष होर्तीकर, सेक्रेटरी रघुनाथ राणे उपस्थित होते.
दीपक वस्त्रे म्हणाले, प्रिंटर्सने स्वत:च्या व्यवसायावर प्रथमत: प्रेम करणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर व्यवसायात यश हे मिळणारच. प्रिंटिंग व्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीने सुरू असून तो योग्य दिशेने केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. अध्यक्ष राजेंद्र भातकांडे यांनी बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनचा इतिहास सांगून असोसिएशन कशाप्रकारे कार्यरत आहे याची माहिती दिली. तरुण भारतचे सल्लागार संपादक व लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले. श्रीधर जाधव यांनी आभार मानले. खानापूर को-ऑप. बँकेच्या संचालकपदी निवड झालेल्या अनिल बुरुड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव परिसरातील प्रिंटर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.









