गोडोली / प्रतिनिधी :
वाढे (सातारा) गावच्या हद्दीतील गट नं. ३५७ येथे रविवार २४ रोजी सायंकाळी ६:४० च्या दरम्यान ॲड. सतिश विठ्ठलराव चव्हाण (वय ३५, रा.देशमुख कॉलनी, सातारा) हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असताना अमित संपत नलवडे (वय ३५ ,रा.वाढे ता. सातारा) यांनी पाठीमागून कोयत्याने डोक्यावर, चेहऱ्यावर असे दोन वार केले. पाठीवर मोठा दगड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना घडली असताना जवळचा असलेल्या एका शेतकऱ्याने त्यांच्या कुटुंबियांना कळविले. कुटुंबियांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन त्यांना साईअमृत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना समजताच ॲड. सतिश चव्हाण यांचा जबाब घेऊन अमित संपत नलवडे यास रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले. ॲड. चव्हाण यांची वाढे गावच्या हद्दीत शेती असून ते नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. शेजारी शेती असलेला अमित नलवडे हा सुध्दा त्याच परिसरात होता. ॲड. चव्हाण यांना पाहून जवळ आला आणि काही वेळ गप्पा मारत उभा होता. ॲड.चव्हाण हे घरी जाण्यासाठी निघाले असताना अमित नलवडे यांनी पाठीमागून डोक्यावर कोयत्याने पहिला वार केला तर दुसरा वार चेहऱ्यावर केला. चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले असतानाच अमित नलवडे याने मोठा दगड घेऊन तो त्यांच्या पाठीवर टाकला दरम्यान दुसरा दगड खांद्यावर मारल्याने जबर दुखापत झाली आहे. ही घटना पाहून एक शेतकरी ऍड. चव्हाण यांच्या मदतीसाठी धावला. त्यानेच कुटुंबियांशी संपर्क करुन तत्काळ घटनास्थळी बोलवून घेतले.
काही महिन्यापूर्वी बांधावरील झाडे तोडली होती. पण कोणताही वाद झाला नव्हता. मात्र, रविवारी सायंकाळी ६:४० च्या दरम्यान तोच राग मनात धरुन अमित नलवडे याने हा हल्ला केला असल्याचे समजते. सद्या ॲड.चव्हाण यांची प्रकृती स्थिर असून अमित नलवडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर 307 व अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती तालुका पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा अधीक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके करीत आहेत.









