ब्रिटनमधील त्रिना यांच्याशी बांधली लग्नगाठ
वृत्तसंस्था/ लंडन
देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे वयाच्या 68 व्या वषी तिसऱ्यांदा बोहल्यावर चढले आहेत. त्यांनी नुकतेच त्रिना यांच्यासोबत लंडनमध्ये थाटामाटात लग्न केले. त्रिना ही मूळची ब्रिटनची असून तेथेच विवाह संपन्न झाला. या सोहळ्याला नीता अंबानी, ललित मोदी आणि उज्ज्वला राऊत यांच्यासह जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. यापूर्वी 2020 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा आपली लग्नगाठ बांधली होती. यापूर्वी, मिनाक्षी (पहिली पत्नी) आणि पॅरोलिन ब्रॉसार्ड (2020) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. साळवे आणि त्यांची पूर्वाश्र्रमीची पत्नी मिनाक्षी यांनी 38 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जून 2020 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला असून दोघांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.
ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे केंद्र सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचे सदस्यही आहेत. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे 68 वषीय वकील साळवे यांनी हायप्रोफाईल केस कुलभूषण जाधव यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खटले हाताळले आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव यांच्या बाजूने खटला लढण्यासाठी साळवे यांनी कायदेशीर शुल्कात केवळ 1 रुपये मानधन घेतले होते. याव्यतिरिक्त टाटा ग्रुप, मुकेश अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी ग्रुप हे त्यांचे काही प्रमुख क्लाइंट्स आहेत.