कराड :
भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालकपदी पाटण तालुक्यातील गुढे गावचे सुपुत्र व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री पदाचा प्रोटोकॉल असणाऱ्या या पदावर अॅड. भरत पाटील यांची नियुक्ती झाल्याने गेली 35 वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याचा सन्मान झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
भारत सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ स्टील’ अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील खणीकर्म, स्टील यासह सर्व प्रकारच्या खनिज उद्योग या महामंडळाच्या अंतर्गत येतात. भारत सरकारच्या फायद्यात असणाऱ्या उपक्रमांपैकी हे महामंडळ असून त्याची वार्षिक उलाढाल सुमारे 66 हजार कोटींची आहे. अॅड. पाटील यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला असून सोमवारी त्यांनी हैद्राबाद येथे महामंडळाच्या बैठकीस उपस्थिती लावली. बुधवार 28 रोजी ते कराडमध्ये येणार असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत.
गेल्या 35 वर्षांपासून अॅड. पाटील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून सक्रीय आहेत. भाजप नेते दिवंगत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढवली होती. भाजपचे राजस्थान, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रात पक्षनिरीक्षक म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
…








