बँक खात्यातून 2 लाख 22 हजार रुपये गायब
प्रतिनिधी/देवरुख
देवरुख मधली आळी येथील प्रौढाची ऑनलाइन फसवणूक करत 2 लाख 22 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला आहे. अज्ञाता विरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरुख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार याबाबत सचिन भालचंद्र गद्रे (51, रा. मधली आळी, देवरूख) यांनी फिर्याद दिली आहे. आपला स्टेट बँक खात्याचा अकाऊंट अपडेट झाला नसून तो अकाऊंट अपडेट करण्यासाठी लिंक पाठवून सचिन भालचंद्र गद्रे यांच्या जॉईंट खात्यातून 2 लाख 22 हजार रुपये काढून घेवून अज्ञाताने ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
सचिन गद्रे यांना दीपक शर्मा नावाच्या इसमाने फोन करून त्यांचा एसबीआयचा अकाऊंट अपडेट नसून तो अपटेड केला नाही तर ब्लॉक केला जाईल असे सांगितले. त्यासाठी त्याने गद्रे यांना एक लिंक पाठवली. त्यानंतर शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे सचिन गद्रे यांनी आलेला ओटीपी लॉगीनमध्ये भरला. त्यानंतर सचिन गद्रे यांच्या जॉईंट खात्यातून सुरूवातीला 98 हजार 639 व दुस्रया वेळी 98 हजार 653 रुपये आयएनबी ऍमेझॉन सेलर या अकाऊंटमध्ये फिर्यादीच्या संमतीशिवाय ट्रान्स्फर झाले.
त्यामुळे फिर्यादी गद्रे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी देवरूख पोलीस स्थानकात ऑनलाईन फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. अज्ञाता विरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत.