ज्युनियर वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धा
वृत्तसंस्था/सुहल, जर्मनी
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अॅड्रियन करमाकरने तीन दिवसांत दुसरे पदक मिळविले. त्याने पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळविले. याआधी त्याने रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्यसह एकूण 4 पदके मिळवित पदकतक्त्यातील अग्रस्थान कायम राखले आहे.
20 वर्षीय अॅड्रियनची ही पहिलीच वर्ल्ड कप स्पर्धा असून त्याने 446.6 गुण नोंदवले. फ्रान्सच्या माजी प्रोन कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियन रोमेन ऑफ्रेरेने 459.7 गुण घेत सुवर्ण व दोन वेळचा प्रोन कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियन जेन्स ओएस्टीने 459.1 गुण घेत रौप्य मिळविले. अॅड्रियन 45 शॉट्सच्या अंतिम फेरीत स्थान मिळविताना पात्रता फेरीत 588 गुण नोंदवत पाचवे स्थान घेतले होते. एकूण 55 नेमबाजांचा यात समावेश होता. या फेरीत रोमेन व जेन्स अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या स्थानावर होते.
महिला विभागात मात्र 17 वर्षीय अनुष्का ठाकुरला कनिष्ठ महिलांच्या 3 पी नेमबाजीत सातवे स्थान मिळाले. या विभागात स्वित्झर्लंडच्या व्हिव्हियन जॉय व एमेली या जीगी भगिनींनी सुवर्ण व रौप्य घेतले तर चीनच्या झु हिने कांस्यपदक मिळविले. आतापर्यंत 9 विविध प्रकारांतील सुवर्णपदके 9 विविध देशांना मिळाली असून त्यात त्रयस्थ अॅथलीट्सचाही समावेश आहे. अजून 7 सुवर्णपदकांच्या लढती होणार आहेत.









