वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर : तलाव, विहिरीत माशांच्या साहाय्याने उपाययोजना
बेळगाव : वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे रोग वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याकडून साठलेल्या पाण्यामध्ये गॅम्बुसिया व गप्पी मासे सोडून रोग नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. साठलेल्या पाण्यामध्ये लार्वा तयार होऊन डासांची पैदास होत आहे. हे रोखण्यासाठी गॅम्बुसिया व गप्पी मासे अत्यंत उपयोगी ठरत आहेत. पाणी अधिक दिवस साठत असणाऱ्या लहानसहान तलावांमध्ये आरोग्य खात्याकडून हे मासे सोडण्यात येत आहेत. यामुळे डासांची पैदास रोखण्यास अधिक सोयीचे होत आहे. यामुळेच तलाव, विहीर, शेततलाव यामध्ये तसेच घराजवळ असणाऱ्या लहानसहान विहिरींमध्ये हे मासे सोडून रोगनियंत्रणासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
88 केंद्रांमध्ये हौद तयार
जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयाच्या आवारामध्ये गप्पी व गॅम्बुसिया माशांच्या संवर्धनासाठी विशेष हौद तयार करण्यात येत आहेत. यामध्ये हे मासे सोडून टप्प्याटप्प्याने सदर आरोग्य केंद्राच्या परिसरात डास निर्मूलनासाठी त्यांचा उपयोग केल जात आहे. जिल्ह्यातील 175 प्राथमिक आरोग्य केंद्र, शहर समुदाय आरोग्य केंद्र यापैकी 88 केंद्रांमध्ये असे हौद तयार करण्यात आले आहेत. उर्वरित आरोग्य केंद्रांमध्ये हौद तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बेळगाव शहरातील किल्ला तलाव, अनगोळ तसेच गोकाक तलावामध्ये गॅम्बुसिया, गप्पी मासे तयार केले जात आहेत. डेंग्यू मलेरिया या रोगांचे प्रमाण वाढल्यास संबंधित ठिकाणी हे मासे सोडून रोग नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत.
घटप्रभेच्या डाव्या कालव्यात सोडले मासे
सौंदत्ती, यरगट्टी, रामदुर्ग, होसकोटी, गोकाक तालुक्यातील खणगाव, बेटगेरी, मक्कळगेरी, शिंदीभावी, गिळीह ाsसूर या गावांमध्ये डेंग्यू व मलेरिया रुग्णांचे प्रमाण अधिक होते. याची दखल घेऊन घटप्रभेच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये मासे सोडले होते. त्यामुळे रोग नियंत्रणास मदत झाली आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
महिन्याला 50 हजार मलेरिया संशयितांचे रक्त नमुने संग्रहित
बेळगाव जिल्ह्यामध्ये सध्या 194 डेंग्यू, 32 चिकुनगुनिया, 5 मलेरिया रुग्णांची नोंद झाली आहे. 2600 डेंग्यू संशयित रुग्ण आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने संग्रहित करण्यात आले आहेत. याबरोबरच 280 चिकुनगुनिया संशयित रुग्ण आहेत. प्रत्येक महिन्याला 50 हजार मलेरिया संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने संग्रहित केले जातात.
डासांची पैदास रोखण्यासाठी गॅम्बुसिया-गप्पी माशाचे उत्पादन
डासांची पैदास रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये गॅम्बुसिया व गप्पी मासे उत्पादन केले जात आहे. रासायनिक औषधांचा वापर न करता जैविक पद्धतीचा उपयोग करून रोग नियंत्रणासाठी व डासांची पैदास रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत.
– डॉ. महेश कोनी (जिल्हा आरोग्याधिकारी)









