अॅडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजीद्वारे तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न
बेळगाव : बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयात सोमवारी अॅडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजीचा (एपीटी 2.0) शुभारंभ करण्यात आला. बेळगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक एस. के. मृणाल यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. पोस्टल विभागातील सर्व उपकेंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने पोस्टल व्यवहार आता गतीने करता येणार आहेत. स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट यासह इतर सेवा नव्या एपीटी सेवेमुळे वेगाने करता येणार आहेत. त्याचबरोबर आता पोस्ट ऑफीसमध्ये क्युआर कोडद्वारे पेमेंट सिस्टीम उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना क्युआर कोड स्कॅन करून कोणत्याही सेवेचे पेमेंट ऑनलाईन करता येणार असल्याचे एस. के. मृणाल यांनी सांगितले. या कार्यक्रमाला साहाय्यक पोस्ट ऑफिसर एस. डी. काकडे, साहाय्यक अधीक्षक बी. पी. माळगे, पोस्टमास्तर लक्ष्मण चौडीमठ यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. बेळगाव मुख्य कार्यालयासोबत आता बैलहोंगल, कित्तूर, यरगट्टी, सौंदत्ती, रायबाग या विभागांमध्ये नवी सेवा दिली जाणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या पोस्ट कार्यालयांमध्येही ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले









