आज आरोग्य केंद्रात कार्यक्रम : आमदार दिगंबर कामत यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी /मडगाव
देश क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने मडगावातील 11 क्षयरोग रुग्णांना दत्तक घेण्यात आले आहे. त्यांना दत्तक घेतलेल्या व्यक्ती औषध पुरविणार आहेत. हा कार्यक्रम आज शनिवारी आरोग्य केंद्रात होणार असल्याची माहिती मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा केला जात असून त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. वरील रुग्णांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम या पंधरवडय़ाच्या अंतर्गत असल्याचे कामत यांनी सांगितले. रुग्ण तसेच त्यांना दत्तक घेणाऱयांची नावे गुप्त ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औषधांच्या पिशव्या आरोग्य केंद्राच्या अधिकाऱयांकडे देण्यात येतील व ते त्या रुग्णांना सुपूर्द करतील, असे यावेळी सांगण्यात आले.
2 ऑक्टोबर रोजी कालकोंडा येथील दैवज्ञ भवनात ‘व्होकल फॉर लोकल’ या शीर्षकाखाली बाजार भरविला जाणार आहे. लोकांनी तयार केलेले साहित्य, वस्तू येथे मांडल्या जाणार आहेत. यावेळी मडगाव गॉट टॅलंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय आकें येथील अग्निशामक दल स्थानकासमोरच्या रस्त्यावर साफसफाई मोहीम राबविण्यात येणार आहे. या पंधरवडय़ात आपण माजोर्डा येथील समुद्रकिनाऱयावरील सफाई मोहिमेत भाग घेतलेला असून रक्तदान शिबिराला उपस्थिती लावली असल्याचे कामत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला नगरसेवक सगुण नाईक, लता पेडणेकर, दामोदर वरक, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, दामोदर शिरोडकर , सिद्धान्त गडेकर व गोपाळ नाईक.