मोफत पाणी योजना चालूच राहणार असल्याचे आश्वासन : पाणी बिलांसाठी ’ऑनलाईन पेमेंट’ सेवेचा शुभारंभ
प्रतिनिधी /पणजी
’पाणी वाचवा-बिल टाळा’ हा मंत्र प्रत्येकाने आत्मसात केल्यास प्रत्येकाला मोफत पाणी योजनेचा लाभ मिळविणे शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनानुसार 16 हजार लीटर पाणी मोफत देण्याची योजना सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टीजेएसबी सहकारी बँकेच्या माध्यमातून पाणी बिले भरण्याच्या ’ऑनलाईन मिडियम ऑफ पेमेंट’ सेवेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर त्यावेळी साबांखामंत्री नीलेश काब्राल, मुख्यसचिव पुनित कुमार गोयल, प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, मुख्य अभियंता संतोष म्हापणे, टीजेसबी बँकेचे सीईओ सुनिल साठे आणि बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक शुभलक्ष्मी शिराली यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी 16 हजार लीटर पाणी मोफत देण्याची योजना बंद करण्यात आलेली नाही. राज्यात साबांखाचे सुमारे 3.5 लाख ग्राहक असून त्यातील सुमारे 1.30 लाख लोकांना 16 हजार लीटर मोफत पाणी योजनेचा लाभ मिळत असल्याचे सांगितले.
मध्यंतरी काही तांत्रिक कारणांमुळे योजनेच्या कार्यवाहित अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या आता पूर्णतः सोडविण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी चार चार कुटुंबासाठी केवळ एकाच मीटरद्वारे पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे भरमसाठ रकमेची बिले येत होती. मात्र त्याचे खापर साबांखाच्या माथी फोडण्यात येऊन त्यातून सरकारवर टीका, दोषारोप करण्यात येत होते. प्रत्यक्षात एका कुटुंबासाठी दरमहा 16 हजार लीटर पाणी पुरेसे आहे. एका कुटुंबासाठी एकच मीटर असेल तर त्यांना बील भरण्याची आवश्यकताच भासणार नाही. त्यासाठी सरकारने दिलेला ’पाणी वाचवा-बिल टाळा’ हा मंत्र प्रत्येकाने आत्मसात करावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
साबांखा अधिकाधिक लोकाभिमूख करणार : काब्राल
काही वर्षांपूर्वी सरकारने वीज बिले भरण्यासाठी ऑनलाईन मिडियम ऑफ पेमेंट सेवा लागू केली होती. त्याच धर्तीवर आता पाणी बिले भरण्यासाठीही सेवेचा शुभारंभ करण्यात येत आहे, याचा आपणास आनंद होते, असे काब्राल यांनी सांगितले. यापुढे पाण्याची बिले दरमहा देण्यात येतील, त्यामुळे ग्राहकांवर भरमसाठबिले भरण्याची वेळ येणार नाही, त्याशिवाय खात्यातर्फे लवकरच विविध सामाजिक माध्यमांद्वारे ऑनलाईन तक्रार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक आपल्या तक्रारी थेट पाठवू शकतील, असे सांगून भविष्यात सार्वजनिक बांधकाम खाते अधिकाधिक लोकाभिमूख करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे काब्राल यांनी पुढे सांगितले.
सौ. शिराली यांनी स्वागत केले. समई& प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बिल भरण्याच्या ऑनलाईन मिडियम ऑफ पेमेंट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. श्री. म्हापणे यांनी आभार व्यक्त केले.









