सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
वृत्तसंस्था/ अलिगढ
सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘एक मंदिर, एक विहिर आणि एक अंत्यभूमी’च्या आदर्शांना अवलंबून सामाजिक सद्भावासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. सरसंघचालक भागवत हे अलिगढच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे स्वयंसेवकांना संबोधित करताना हिंदूंना समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.
हिंदू समाजाचा पाया म्हणून भागवत यांनी यावेळी संस्कारांच्या महत्त्वाला अधोरेखित केले आणि हिंदूंना परंपरा, सांस्कृतिक मूल्ये आणि नैतिक तत्वांवर आधारित समाज निर्माण करण्याचा आग्रह केला. केवळ सशक्त नव्हे तर सर्व घटकांना सोबत घेत वाटचाल करणारा समाज आम्हाला घडवायचा आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना स्वत:च्या घरांमध्ये आमंत्रित करावे, जेणेकरून तळागाळात सद्भाव आणि एकतेचा संदेश फैलावला जाऊ शकेल असे भागवत यांनी म्हटले आहे.
परिवार हा समाजाची मूलभूत शाखा आहे, जो संस्काराने प्राप्त मजबूत कौटुंबिक मूल्यांवर आधारित आहे असे म्हणत सरसंघचालकांनी राष्ट्रवाद आणि सामाजिक एकतेच्या पायाला मजबूत करण्यासाठी सणांच्या सामूहिक उत्सवाला प्रोत्साहित केले. 17 एप्रिलपासून सुरू झालेल्या स्वत:च्या 5 दिवसीय दौऱ्यादरम्यान सरसंघचालक बृज क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांच्या संघ प्रचारकांना भेटत त्यांच्यासोबत विचारांचे आदान-प्रदान करत आहेत.









