राज्य परिवहन मंडळ नोकर संघाची मागणी
बेळगाव : परिवहनने कोरोनाकाळात हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी केले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी संकटात सापडले आहेत. परिवहनने कर्मचाऱ्यांना तातडीने बिनशर्त पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य परिवहन मंडळ नोकर संघातर्फे आंदोलनाद्वारे केली आहे. परिवहन विभागातील चारही विभागांमध्ये वाहनचालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचारी म्हणून सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर काही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊन नोकरीत कायम करावे. याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, सत्तेवर आलेल्या सरकारकडून सहा महिने उलटले तरी अद्याप दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम आहेत. 2021 मध्ये निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना बिनशर्त पुनर्नियुक्त करावे, शक्ती योजना सुरू झाल्यापासून परिवहन कर्मचाऱ्यांवर नोंदविलेले दंड मागे घ्यावेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन द्यावी, चार महामंडळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीदेखील कर्मचाऱ्यांनी केली आहे.









