बनावट दाखल्यांविरुद्ध व्हीटीयूची कारवाई
बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या 51 विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्दबातल ठरविला आहे. या विद्यार्थ्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग या संस्थेचे बनावट दाखले प्रवेश घेताना सादर केले होते. आश्चर्याची बाब म्हणजे तांत्रिक शिक्षण विभागाने त्यांचा दाखला ग्राह्या धरला होता. मात्र, व्हीटीयूने काटेकोरपणे छाननी करताना हे दाखले नाकारले आहेत. छाननी करताना या विद्यार्थ्यांचे दाखले व प्रमाणपत्र खोटे असल्याचे आढळून आले. हा फार मोठा घोटाळा असण्याची शक्यता व्हीटीयूचे कुलगुरु एस. विद्याशंकर यांनी व्यक्त केली आहे. तांत्रिक शिक्षण विभागाने गेल्या पाच वर्षांत दिलेल्या प्रमाणपत्रांची आता तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









