गोवा विद्यापाठाने जारी केला नवा आदेश : प्राचार्यांच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका
पणजी : मडगाव येथील कारे कायदा महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या प्रकरणानंतर गोवा विद्यापीठाने काल मंगळवारी एक अधिसूचना जारी करून प्रथम वर्ष कायदा महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 180 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले असून आता त्यासाठी नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रोफेसर व्ही. एस. नाडकर्णी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या आदेशानंतर शिक्षणक्षेत्रात खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना झालेल्या त्रासाचे काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. वरिष्ठांच्या गोंधळाची शिक्षा विद्यार्थ्यांनी का म्हणून भोगावी? असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दीड महिना उलटल्यानंतर प्रवेश रद्द
महाविद्यालयाचा अभ्यासक्रम सुरू होऊन आता जवळपास एक महिना उलटल्यानंतर अचानक गोवा विद्यापीठाने प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या कायदा महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना कॉलेजमधून कमी केले आहे. महाविद्यालय प्रवेश नियमात झालेल्या गोंधळाचा फटका साळगावकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देखील बसला आहे.
प्राचार्यांच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका
कारे महाविद्यालयाच्या प्राचार्याने प्रवेश नियमांमध्ये दुऊस्ती करून जो गोंधळ निर्माण केला त्याचा फटका अकारण 180 विद्यार्थ्यांना बसला आहे. परिणामी गेले दीड महिनाभर महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतरही आता या प्रथम वर्गातील विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश घ्यावा लागणार असून त्यासाठी पुन्हा प्रवेश परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
सहा ऑगस्टला पुन्हा परीक्षा
या नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार कायदा महाविद्यालयातील प्रवेशाकरिता दि. 6 ऑगस्ट रोजी परीक्षेला बसावे लागेल. दि. 8 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. अन्य कोणालाही परीक्षेस बसता येणार नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी दि. 8 जून रोजी परीक्षा दिली होती, त्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेस बसण्यास संधी मिळणार आहे. त्याचबरोबर आजपासून प्रथम वर्ष कायदा महाविद्यालयातील वर्ग रद्द करण्यात आलेले आहेत.नव्याने परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अगोदरच्या परीक्षेत म्हणजेच बारावी मधील 50 टक्के आणि प्रवेश परीक्षेतील अर्थेत जीसीईटी परीक्षेतील 50 टक्के गुण या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे गोवा विद्यापीठाने जारी केलेल्या नव्या आदेशात म्हटले आहे.









