पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील अध्यापक महाविद्यालयात शासकीय कोटय़ातील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी गुरुवारपासून विशेष फेरी आयोजित केली आहे. या फेरीत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीने ऑनलाईन प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी दिली.
राज्यातील अध्यापक विद्यालयातील डी.एल.एड. अभ्यासक्रमासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या शासकीय कोटय़ातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यास शिक्षण आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार परिषदेने या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावी उत्तीर्ण झालेले आणि नव्याने प्रवेश अर्ज भरण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी, नियमित प्रवेश प्रक्रियेत अर्ज पूर्ण न भरलेले असे सर्व विद्यार्थी या विशेष फेरीत सहभागी होऊ शकणार आहेत.
या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही जिल्ह्यातील विद्यार्थी कोठेही अर्ज करू शकतो आणि प्रवेश घेऊ शकतो, असे काठमोरे यांनी स्पष्ट केले आहे.
डी.एल.एड प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विशेष फेरीचे वेळापत्रक –
– विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे : 3 ते 7 ऑगस्ट
– पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे : 3 ते 8 ऑगस्ट
– पडताळणी केलेल्या अर्जात दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांनी दुरुस्ती करणे, दुरुस्ती केलेल्या अर्जांची अधिकाऱ्यांनी ऑनलाईन पडताळणी करणे : 3 ते 9 ऑगस्ट
– विद्यार्थ्यांनी अध्यापक विद्यालय निश्चित करून स्वत:चे प्रवेशपत्र काढून घेणे : 3 ते 10 ऑगस्ट
– अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून ऑनलाईनद्वारे प्रवेश देणे : 3 ते 14 ऑगस्ट
अधिक माहितीसाठी आणि प्रवेश अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ – www.maa.ac.in








