कोल्हापूर / इम्रान गवंडी :
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा मांगल्याचा सण म्हणजे गुढीपाडवा… या मांगल्याच्या मुहूर्त साधून चालू शैक्षणिक वर्षासाठी पहिलीच्या वर्गात प्रवेश निश्चितीसाठी शिक्षक, प्रशासनासह पालकांची लगबग सुरू असते. प्राथमिक शिक्षण मंडळाकडून गावागावात जाऊन 6 वर्षांपर्यंतच्या मुलांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही कामाची सुरुवात शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. हीच परंपरा कायम राखत प्रवेश पहिलीचा… मुहूर्त गुढीपाडव्याचा असे म्हणत प्रवेश निश्चिती केली जात आहे.
गोर–गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. आजही महापालिका, जिल्हापरिषदेच्या शाळांतून मुलांना मोफत शिक्षण दिले जात आहे, ‘आला गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून महापालिका व जिल्हा परिषदेच्यावतीने राबविला जात आहे. यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश निश्चितीसाठी प्रक्रिया राबविली जात आहे. मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व शाळेबाबत आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी शिक्षकांकडून गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोण निर्माण होतो. महापालिका शाळांमध्ये पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत केल जाते. काही शाळांमध्ये खास सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले आहेत.
महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयाने तर यंदा प्रवेशासाठी एक गाणे तयार केले आहे. हा शहरातील पहिलाच प्रयोग आहे. महापालिकेच्या जरगनगर शाळेत प्रवेश घेण्यासाठी रात्रीपासूनच पालकांच्या रांगा लागलेल्या असतात हे एक खास वैशिष्ठ्या आहे. महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढत असल्याचे यातून अधोरेखित होत आहे. यापाठोपाठ टेंबलाईवाडी विद्यामंदिर, महात्मा फुले विद्यालय, नेहरुनगर विद्यालय, पानसरे विद्यालय, जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्यालय, मनपा उर्दू–मराठी स्कूल, विचारे विद्यालय आदी शाळांमध्ये दरवर्षी प्रवेश फुल्ल असतात.
- खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळेतही प्रक्रिया
शहर व जिल्ह्यात खासगी अनुदानित, विना अनुदानित 66 शाळा आहेत. यामध्ये सुमारे 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्येही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेश निश्चितीची प्रक्रिया राबविली जात आहे.
मनपाच्या 20 शाळा इंग्रजी माध्यम
महापालिकेच्या सध्या 58 शाळा आहेत. पालकांचा इंग्रजी शाळेत मुलांना प्रवेश घेण्याकडे अधिक कल आहे. याचा विचार करून मनपा प्रशासनाने यंदा तीन सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग वाढविले आहेत. सध्या मनपाच्या 20 शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या होणार आहेंत. यामुळे शाळांचा दर्जा वाढत आहे. मुलांना बौद्धिक क्षमता वाढावी यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
- मनपा शाळांमध्ये नाविन्य उपक्रम
यंदाच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने नविन शैक्षणिक उपक्रमासाठी भरघोस निधीची तरतुद केली आहे. यामध्ये तीन शाळांमध्ये रोबोटिक लॅब, फिरते तारांगण, शहरस्तरीय विशेष बालासुविधा केंद्र, भाषा प्रयोगशाळा, विद्यार्थी समुपदेशक, समृद्ध शाळा अभियान, मॉडेल स्कूल, ई–लर्निंग, सेमी इंग्रजी माध्यम, शिक्षक प्रशिक्षण केंद्र आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सर्वाधिक पटसंख्या असणारे मनपा जरग विद्यामंदिर महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरात दरवर्षी पहिलीच्या प्रवेशासाठी वेटिंग लागते. राज्यात सर्वात जास्त पटसंख्या असणारे महापालिकेची शाळा म्हणून नावलौकिक आहे. शाळेचा दर्जा, शिस्त, विद्यार्थ्यांची वाढणारी गुणवत्ता पाहूणच पालकही आपल्या पाल्याचा याच शाळेत प्रवेश व्हावा, असा आग्रह करतात. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नावनोंदणी करण्यासाठी पालक रात्रभर रांगेत उभे राहतात. नावनोंदणीच्या आदल्या रात्री 12 वाजताच पालक या शाळेच्या बाहेर जमलेले असतात.
- शहरातील महापलिका शाळा : 58
एकूण विद्यार्थी : 10,587
एकूण शिक्षक : 277
सेमी इंग्रजी माध्यम : 20
खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा : 66
विद्यार्थ्यांची संख्या : 25 हजार
- गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य
महापालिकेच्या शाळेत सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग वाढविले आहेत. वीस शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर चालू शैक्षणिक वर्षापध्ये नवीन उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी निधीतही वाढ करण्यात आली आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे.
–के. मंजूलक्ष्मी, प्रशासक, महापालिका
- ‘गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा’
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा पवित्र समजला जाणाऱ्या गुढीपाडव्याला पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत करावा, या उद्देशाने ‘गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा’ हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविला जातो. या अनुषंगाने गुढी पाडव्यादिवशी आपल्या दाखलपात्र (6 वर्षे पूर्ण असणाऱ्या) बालकाचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करुन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा शुभारंभ करावा, हा हेतू आहे. याचा प्रभावी लाभही होत असल्याचे मागील काही वर्षाच्या वाढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
- महापालिका, जिल्हा परिषद शाळेत मोफत शिक्षण
महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. दिव्यांग मुलांसाठीही विशेष शिक्षणाची तरतुदही केली आहे. यामध्ये मोफत पाठ्यापुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृती, स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मार्गदर्शन, डीजिटल शाळा, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आदींचा समावेश आहे.
- मनपा शाळांसाठी अर्थसंकल्पात 20 कोटींची वाढ
महापालिकेच्या शाळांचा दर्जा आणखी वाढवा, पटसंख्या वाढावी, शाळांच्या भौतिक सुविधा वाढाव्यात यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्राथमिक शिक्षण मंडळासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. गतवर्षी 80 कोटी रुपयांची तरतुद होती. शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी यंदा 20 कोटी रुपयांची जादा वाढ करण्यात आली. यातून नवनवीन व विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडावा या हेतूने विविध उपकम राबविण्यात येणार आहेत.
- नवीन उपकमांचे विद्यार्थ्यांना फायदे :
–महापालिकेतील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुध्दिमत्ता, 3 डी मशिनिंग, बिग डेटा विश्लेषण आणि मशीन लर्निंग सारख्या क्षेत्रासाठी पूर्वतयारी करणे सोपे जाणार आहे.
–तारांगण खगोलशास्त्र आणि रात्रीच्या आकाशाविषयी शैक्षणिक आणि मनोरंजक कार्यक्रम सादर करता येणार
–शहरांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेय तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार
–भाषा प्रयोगशाळातून विद्यार्थ्यांना त्याचे उच्चार, शब्दसंग्रह, व्याकरण सुधारण्यास ऑडिओ व्हिजुअल्स साहित्याच्या माध्यमातून मदत होईल
–विद्यार्थ्यांना समुपदेशक केले जाणार.
–मोबाईल, संगणक, इंटरनेटद्वारे होणारे तोटे दूर करण्यासाठी व संस्कार रुजवण्यासाठी समुदेशन वर्ग घेतले जाणार आहेत.
–राजर्षी छत्रपती शाहू समृध्द शाळा अभियानातून भौतिक व गुणात्मक विकास साध्य
–विद्यार्थी वाद्यवृंदातून शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे.
– ई–लर्निंग व ऍन्ड्रॉईड टी. व्ही. सुविधेमुळे विविध शैक्षणिक सॉफ्टवेअर अध्ययन व अध्यापनात वापर केला जाणार आहे.
–मॉडेल स्कूल्स बनवण्यासाठी आराखडा
–विद्यार्थ्यांची विज्ञान, सामान्यज्ञान वाढीसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन
–अॅबॅकस व वैदिक गणित अध्यापन, अध्ययन प्रक्रिया बालवयात समजण्यासाठी अधिक सुलभ होणार
–शिक्षक, प्रशिक्षण सुसज्ज केंद्रामुळे विद्यार्थी घडण्यास मदत
–हॅन्डवॉश स्टेशनमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत
– दिव्यांग विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणाची सोय








