कोल्हापूर / संतोष पाटील :
राज्यात महायुतीचे सरकार येताच ‘गोकुळ’मध्येही सत्ताबदल होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशासक नेमण्याचे केलेले सुतोवाच, विधानसभा निवडणुकीच्या निकालाने बदललेले जिह्याचे राजकीय संदर्भ, मंत्री हसन मुश्रीफ वगळता आमदार सतेज पाटील यांना ‘गोकुळ’च्या पर्यायाने सहकार क्षेत्रातील राजकीय व्यासपीठावर कमी झालेला पाठींबा आदी कारणांमुळे ‘गोकुळ’मध्ये प्रशासक येणार? जिह्यातील झाडून सगळे नेते एका बाजूला येत सत्तांतर करणार? की निवडणूक होईपर्यंत आहे तशीच परिस्थिती राहणार? याच नेमकं उत्तर अनुत्तरीत असले तरी हे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत.
गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार असल्याचे ठामपणे परंतु खासगीत बोलले जात आहे. मुख्य प्रशासक आणि शासकीय सदस्यांची यादीही कानोकानी ऐकवली जात आहे. शासनाने केलेल्या लेखापरीक्षण अहवालाची साक्ष दिली जात आहे. गोकुळ दूध संघावर प्रशासक येईल वा आहे ते कारभारी राहतील, काहीही झाले तरी अमुल दूध संघाचे कडवे आव्हान समोर असताना गोकुळ ब्रॅंड कायम ठेवण्याचे आव्हान आजी–माजी कारभाऱ्यांसमोर असणार आहे.
राज्य सरकार स्थिर झाल्याने लवकरच गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार आहे. एक खासदार हे मुख्य प्रशासक असतील तर एक विद्यमान आमदार, उर्वरित दोन खासदारांचे प्रतिनिधी, एका वजनदार आमदाराचा प्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी यांचा सदस्य म्हणून सहभाग असेल, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. शासनाने लेखापरीक्षण केल्याने याला बळकटी मिळत असली तरी अधिकृतपणे अशी कोणतीही शक्यता यातील मुख्य घटकांनी व्यक्त केलेली नाही. ‘गोकुळ’वर प्रशासक आलेच तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आर्थिक आणि राजकीय कोंडी करणे, नवीन दूध संस्था सभासदांचा मतदानापर्यंतचा मार्ग रोखणे ही प्रमुख कारणे असू शकतात. गोकुळ दूध संघाचे झालेले लेखापरीक्षण आणि अनुषंगाने मिळत असलेले संकेत पाहता प्रशासक येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
‘गोकुळ’मध्ये चेअरमन बदलाची प्रक्रिया सुरू होताच सत्तांतरासाठी आवश्यक बारा पेक्षा अधिक संचालकांची जोडणी विरोधी आघाडीला करावी लागेल. कागदावरील आकडेमोड पाहता मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांची आघाडी कायम राहिल्यास बहुमताचा जादुई आकडा गाठणे विरोधी आघाडीला कठीण जाणार आहे. विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे किंवा ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे निवडणूक वर्षामुळे चेअरमनपद देण्याची खेळी खेळली जाऊ शकते. मंत्री हसन मुश्रीफ यांनी संकेत दिल्याप्रमाणे सतेज पाटील यांच्यासमवेत असलेली ‘गोकुळ’मधील आघाडी पाच वर्षे कायम राहील, अशी स्थिती आहे. त्यास जिल्हा बँकेच्या राजकारणाची किनार आहे. त्यामुळे ‘गोकुळ’मध्ये मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात ठरलेल्या सत्तासुत्रानुसार फार तर चेअरमन बदल होईल, सत्तांतर होण्याची शक्यता कमी असल्याचाही सूर आहे. मात्र राज्यस्तरावरील घडामोडी पाहता ‘गोकुळ’चे राजकारण ढवळून काढण्यासाठी जोरदार घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत. या राजकीय घुसळणीतून ‘गोकुळ’चे राजकारण कोणत्या दिशेने जाणार, हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.
नवीन चेअरमनपदासाठी फिल्डींग
विश्वास पाटील यांना पहिली दोन वर्षे चेअरमनपदाची संधी आघाडीने दिली आहे. 10 मे 2023 रोजी विश्वास पाटील यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अरुण डोंगळे ठरल्याप्रमाणे 2 वर्षासाठी चेअरमन झाले. निवडणूक वर्ष असल्याने चेअरमनपदाची लॉटरी कोणाला लागणार, याची उत्सुकता आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्याने जिह्यातील अनेक राजकीय संदर्भ बदलले. याचा प्रत्यक्षपणे परिणाम नव्या चेअरमन निवडीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहे ते चेअरमन कायम राहणार की नवीन निवडीची रिस्क कारभारी नेते घेणार? याचीही चर्चा रंगली आहे.








