पुण्य सलिला नव्या आरोग्य सचिव : राजेश कुमार सिंग संरक्षण सचिव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने शुक्रवारी सचिव स्तरावर मोठे फेरबदल केले. सचिव पातळीवरील जवळपास 20 अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या व नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. वरिष्ठ आयएएस अधिकारी पुण्य सलिला श्रीवास्तव यांना आरोग्य सचिवची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजेश कुमार सिंग यांची नवीन संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार, सध्या पंतप्रधान कार्यालयातील विशेष सचिव पुण्य सलिला ह्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) म्हणून कार्यभार स्वीकारतील. 30 सप्टेंबर रोजी अपूर्व चंद्रा यांच्या निवृत्तीनंतर त्या आरोग्य सचिव बनतील.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह सध्या संरक्षण मंत्रालयात ओएसडी म्हणून कार्यभार सांभाळतील. 31 ऑक्टोबर 2024 रोजी गिरीधर अरमाने यांच्या निवृत्तीनंतर ते संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारतील. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने राजेश कुमार सिंग यांच्या सेवा निवृत्तीच्या वयाच्या पुढे 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे.
चंद्रशेखर कुमार हे अल्पसंख्याक विभागाचे नवे सचिव
राजेश कुमार सिंग यांच्या जागी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अमरदीप सिंग भाटिया हे औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव असतील. अल्पसंख्याक व्यवहार सचिव कटिथिला श्रीनिवास हे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव असतील. श्रीनिवास यांच्या जागी पंचायती राज मंत्रालयातील विशेष सचिव चंद्रशेखर कुमार हे अल्पसंख्याक व्यवहार विभागाचे नवे सचिव असतील. वरिष्ठ अधिकारी दीप्ती उमाशंकर यांची राष्ट्रपतींच्या नवीन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या कोळसा मंत्रालयात अतिरिक्त सचिव असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी नागराजू मदिराला हे जोशी यांच्या जागी नवे वित्तीय सेवा सचिव असतील.









