कित्तूर कल्याण कर्नाटक सेना पार्टीचा आरोप
बेळगाव : उत्तर कर्नाटक विकासापासून अद्याप खूप लांब आहे. दक्षिण कर्नाटकाचा विकास झाला. परंतु, त्यामानाने उत्तर कर्नाटकाच्या पदरात काहीच पडले नाही. सर्व सरकारी कार्यालये, महत्त्वाचे विकास प्रकल्प हे दक्षिण कर्नाटकातच आहेत. त्यामुळे भविष्यात सर्व महत्त्वाची कार्यालये बेळगावमध्ये आणावीत, अशी मागणी कित्तूर कल्याण कर्नाटक सेना पार्टीच्यावतीने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौध बांधण्यात आले. परंतु, वर्षातून एखादे अधिवेशन झाल्यानंतर त्याचा शून्य उपयोग होत आहे. उत्तर कर्नाटकात कोणतेही मोठे प्रकल्प आणण्यात आले नाहीत. राज्यकर्ते हे स्वत:च्या स्वार्थापोटी दक्षिण कर्नाटकात सर्व उद्योग, व्यवसाय घेऊन जात आहेत. सिंचन, रस्ते, वीज, शिक्षण, वाहतूक, आरोग्य व इतर सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सध्याचा कर्नाटक हा दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागांमध्ये विभागत चालला आहे.
उत्तर कर्नाटकातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कित्तूर कल्याण कर्नाटक सेनेची स्थापना करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष सिद्दनगौडा पाटील यांनी दिली. उत्तर कर्नाटकातील नागरिकांना रोजगाराच्या संधी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास महिला राज्याध्यक्ष अन्नपूर्णा निर्वाणी यांनी दिला.









