जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : विजयनगर-हिंडलगा परिसरात गेल्या काही दिवसांपासून गाढवांना सोडून देण्यात आले आहे. त्या गाढवांना चारा नाही, पाणी नाही. त्यामधील गाढवांचा मृत्यूही झाला आहे. तर काही गाढवं अत्यवस्थ झाली आहेत. ही गाढवं बेवारस असल्यामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावर ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तेव्हा तातडीने या गाढवांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागेश माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विजयनगर परिसरात बेवारसपणे गाढवं फिरत आहेत. ती कोणी सोडली हे समजणे देखील अवघड झाले आहे. त्या गाढवांना पाणी, चारा नसल्याने ती तडफडत आहेत.
उपाययोजनेची मागणी
तेव्हा याबाबत सामाजिक संघटना तसेच जिल्हा प्रशासनानेही उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जवळपास 25 ते 30 गाढवं असून त्यामधील काही गाढवांचा मृत्यू देखील झाला आहे. तेव्हा तातडीने त्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
महापालिका-पशुसंगोपन खात्याचेही दुर्लक्ष
महापालिका तसेच पशुसंगोपन खात्यानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विजयनगर, विनायकनगर, विनायक मंदिर आदी भागामध्ये ही गाढवं कळप करून फिरू लागली आहेत. सध्या ती पाणी व चाऱ्याविना शारीरिकदृष्ट्या अशक्त झाली आहेत. त्यांना चाऱ्याची नितांत गरज आहे. तेव्हा महापालिका, मनपा व पशुसंगोपन खात्याने याकडे लक्ष देवून त्या गाढवांसाठी चारा तसेच पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.









