वार्ताहर/कणकुंबी
गोव्याहून बेळगावकडे येणाऱ्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या कणकुंबी येथील अबकारी अधिकाऱ्यांचा कारभार म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी असाच म्हणावा लागेल.कणकुंबी अबकारी अधिकाऱ्यांची सामान्य प्रवाशांच्या बाबतीत अरेरावी त्रासदायक ठरत आहे. गोव्याहून एक-दोन मद्याच्या बाटल्या आणलेल्या प्रवाशांना दमदाटी करून बॉटल काढून घेतल्या जातात. परंतू कणकुंबी-जांबोटी भागाबरोबरच बेळगाव परिसरापर्यंत दारूची तस्करी करणाऱ्या व्यक्तींना अबकारी पोलीस व अधिकारी पाठीशी घालतात. काही निवडक व्यक्तींना सोडून सामान्य माणसांना दमदाटी करणाऱ्या अबकारी अधिकाऱ्यांचे अनेक कारनामे आहेत.
काढून घेतलेल्या बाटल्यांची पुन्हा विक्री
गोव्याहून,बेळगावकडे येताना काही वयोवृद्ध व्यक्ती किंवा सामान्य व्यक्ती गोव्याला मद्य स्वस्त असल्याने एखादं दुसरी बॉटल घेऊन येतात. कणकुंबी अबकारी तपासणी नाक्यावर बस किंवा खासगी वाहने थांबवून तपासणी केली जाते. यावेळी प्रवाशांकडून बळजबरीने काढून घेतलेल्या एक-दोन बाटल्या स्थानिक लोकांना किंवा आपल्या मर्जीतील लोकांना पुन्हा विकल्या जातात. कणकुंबी भागातील काही ओळखीच्या व निवडक व्यक्तीना गोव्याच्याच किमतीत बाटल्या विकून पैसे कमावण्याचा कणकुंबी अबकारी तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांचा धंदाच झाला आहे.
दारू तस्करीला कणकुंबी अबकारी अधिकाऱ्यांचा वरदहस्त
कणकुंबी भागातील तसेच अन्य परिसरातील काही गावांमध्ये चोरट्या दारुचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडून राजरोसपणे दारूची तस्करी केली जाते. कणकुंबी अबकारी तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांना हप्ते देऊन गोव्यातील दारूची विक्री करण्यात येते. दारू तस्करी करणाऱ्या काही व्यक्तींचे कणकुंबी अबकारी पोलीस व अधिकाऱ्यांबरोबर साटेलोटे असल्याने त्यांची दुचाकी किंवा चारचाकी वाहने तपासणी न करताच सोडून दिली जातात. म्हणजे अधिकाऱ्यांना हप्ते दिले की गाडी तपासली जात नाही. प्रत्येक गावात अशा दोन-तीन व्यक्ती कणकुंबी अबकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीच दारूची तस्करी करतात, अशी या भागात चर्चा आहे. कणकुंबी-जांबोटी भागातील काही गावांमध्ये अबकारी पोलिसांच्या आशीर्वादाने गोव्याच्या दारूची विक्री केली जात आहे. सामान्य जनतेकडून एखाद दुसरी बॉटल काढून घेऊन दारूची तस्करी करणाऱ्या व्यक्तीना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.









