चाचणी परीक्षा प्राधिकारणाने सादर केलेल्या प्रत्युत्तरावर होणार युक्तीवाद
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
नीट-युजी परीक्षा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होत असलेली सुनावणी लांबणीवर पडली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. राष्ट्रीय चाचणी परीक्षा प्राधिकारणानेही प्रतिज्ञापत्र सादर केले असून प्रश्नपत्रिका फुटीचा आरोप फेटाळला आहे. तसेच गैरप्रकार झालेच असतील तर त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे, असे प्रतिपादन प्रतिज्ञापत्रात केले आहे. गुरुवारी या प्रकरणी पुढची सुनावणी होणार होती. मागच्या 8 जुलैच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चौकशीचा यथास्थिती अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार केंद्र सरकारने हा अहवाल बंद लिफाफ्यातून न्यायालयाला गुरुवारी सादर केला. मात्र, काही कारणामुळे सुनावणी होऊ शकली नाही. आता ती 18 जुलैपासून पुन्हा होणार आहे.
कौन्सिलिंगसंबंधी घोषणा
केंद्र सरकारच्या वतीने गुरुवारी न्यायालयात कौन्सिलिंग प्रक्रियेच्या वेळापत्रकासंबंधी माहिती देण्यात आली. वैद्यकीय कौन्सिलिंग समिती या प्रक्रियेचे वेळापत्रक जुलैच्या तिसऱ्या सप्ताहात घोषित करणार आहे. ही प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
आरोप तथ्यहीन
नीट-युजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपाचा परीक्षा प्राधिकरणाने इन्कार केला आहे. तसेच यंदाचे या परीक्षेचे परिणाम कोणत्याही अर्थाने असाधारण नसल्याचे प्रतिपादनही केले आहे. आयआयटी मद्रास या संस्थेने 2023 आणि 2024 मधील नीट परीक्षांचे तुलनात्मक विश्लेषणही प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. या संस्थेच्या निष्कर्षानुसार यंदाच्या नीट परीक्षेचा परिणाम असाधारण नाही. ज्या प्रकारे प्रत्येक परीक्षा केंद्रातील परिणाम समोर आले आहेत, त्यानुसार कोणताही लक्षणीय गैरप्रकार झाल्याचे दिसून येत नाही. या परीक्षेच्या गुणवत्ता सूचीचा अभ्यास करता कोणत्याही एका राज्यातील, शहरातील किंवा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी अन्य केंद्रांपेक्षा फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे परीक्षा ‘नीट’पणे पार पडल्याचे दिसून येते.









