शिवसेनेतील बंडखोरांच्या मतदार संघात सभा, मेळावे घेणार : जनतेसह शिवसैनिकांशी संवाद साधणार
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता बंडखोर, फुटीर आमदार, खासदारांच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पाऊल उचलले आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभरातील जनतेशी संवाद साधत आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात जनमत तयार करत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ऑगस्टमध्ये स्वतः आपणही राज्याचा दौरा सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे येत्या मंगळवारी 2 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
आदित्य ठाकरे याआधी 28 ते 31 जुलै दरम्यान कोल्हापूर दौऱयावर येणार होते. त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून ते 2 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हय़ात कोल्हापूर, जयसिंगपूर आणि गारगोटी येथे सभा घेणार असल्याची माहिती शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून देण्यात आली. ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सांगितले की, 1 ऑगस्ट रोजी रात्री आदित्य ठाकरे कोकणातील दौरा आटोपून कोल्हापूरमध्ये दाखल होतील. येथेच त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर 2 ऑगस्टला ते सभा घेतील. त्याचबरोबर ते शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहे. दौरा कार्यक्रम निश्चित करण्याचे काम वेगाने सुरू आहे, असेही पवार यांनी सांगितले.
बंडखोरांच्या मतदार संघात सभा
खासदार संजय मंडलिक, धैर्यशिल माने यांच्यासह आमदार प्रकाश आबीटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे सहयोगी आमदार तथा माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आदी शिंदे गटात सहभागी झाले होते. या बंडखोरांच्या मतदार संघात आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. शिवसेनेच्या रणनीतीनुसार बंडखोरी केलेल्या आमदार, खासदारांच्या प्रभाव क्षेत्रात आदित्य ठाकरे यांच्या सभा सुरू आहेत. ऑगस्टनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात शिवसेना नेत्यांचे दौरा, कार्यक्रम, सभा, मेळावे, बैठका यांचे मोठय़ा प्रमाणावर आयोजन होणार आहे.