ऑनलाईन टीम/तरुण भारत
युवासेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे निष्ठा यात्रा करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आज आदित्य ठाकरे हे मुंबईतील दहिसर भागात आले असता त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना बंडखोरांवर निशाणा साधला. फुटीर गटातही दोन गट आहेत. एक गट असा आहे की, ज्यांना जबरदस्तीने पळवून नेण्यात आलंय. मात्र, त्यांना परत यायचं आहे. काही जणांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहेत. थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना केलं आहे.
मला बंडखोरांना एकच निरोप द्यायचा आहे, जिथे गेला असाल तिथे आनंदी रहा. तुमच्या मनात आमच्याबाबत जसा राग, द्वेष आहे तसा आमच्या मनात नाहीये. मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की, तुमच्यात थोडी जर लाज उरली असेल, हिंमत उरली असेल… जिथे गेला असाल तिथे आनंदी रहा पण पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा आणि मग जनता जो कौल देईल, जो निकाल देईल तो मला मान्य असेल.
पोटदुखी हीच की, ठाकरे परिवारातलं कुणीतरी विधीमंडळात आलं. आतापर्यंत आपण बाहेर जे करतोय ते आधी मातोश्रीवर कळत नव्हतं, आता कळतंय. दिवसभर क्लेषदायक चित्र बघून घरी आलो तेव्हा मला आपले काही शिवसैनिक भेटले. तेव्हा लक्षात आलं की आपल्याबद्दल अजूनही प्रेम आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मला आरोप-प्रत्यारोप करायचे नाही, जे गेले ते गेले त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्यात पण दोन गट आहेत. जे लवकरच कळतील. कारण एक गट असा आहे की, ज्याला खरोखर जायचे होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली उतरवले. त्यामुळे त्यांना यातच आनंद मिळतो, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.








