पृथ्वीपासून कमाल अंतर आता 1.21 लाख किमी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इस्रोने गुरुवारी आदित्य एल1 कक्षा चौथ्यांदा वाढविली आहे. याकरता काही काळासाठी थ्रस्टर फायर करण्यात आले. आता आदित्य एल1 चे पृथ्वीपासून किमान अंतर 256 किलोमीटर तर कमाल अंतर 1 लाख 21 हजार 973 किलोमीटर झाले आहे. आदित्य सोलर मिशन 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते.
हे ऑपरेशन इस्ट्रॅक बेंगळूर येथून करण्यात आले. यादरम्यान सॅटेलाइटला मॉरिशस आणि पोर्ट ब्लेअरमधील इस्रोच्या ग्राउंड स्टेशन्समधून ट्रॅक करण्यात आले. आता 19 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजता याला लॅगरेंज पॉइंट एल1 च्या कक्षेत स्थापित करण्यासाठी कक्षा वाढविण्यात येणार आहे.
इस्रोने यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 2.30 वाजता आदित्य एल1 स्पेसक्राफ्टची कक्षा तिसऱ्यांदा वाढविली होती. तेव्हा हे यान पृथीपासून 196 किलोमीटर गुणिले 71,767 किलोमीटरच्या कक्षेत पाठविण्यात आले होते. म्हणजेच पृथ्वीपासून सर्वाधिक अंतर 71,767 किलोमीटर आणि सर्वात कमी अंतर 296 किलोमीटर इतके होते.
5 सप्टेंबर रोजी आदित्य एल1 स्पेसक्राफ्टची कक्षा दुसऱ्यांदा वाढविण्यात आली होती. तेव्हा हे यान पृथ्वीच्या 282 किलोमीटर गुणिले 40,225 किलोमीटरच्या कक्षेत पाठविण्यात आले होते. म्हणजे यानाचे पृथ्वीपासून सर्वात कमी अंतर 282 किलोमीटर तर सर्वाधिक अंतर 40,225 किलोमीटर इतके राहिले होते.
आदित्य एल1 ला 2 सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही-सी57 च्या एक्सएल वर्जन रॉकेटद्वारे श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते. प्रक्षेपणाच्या 63 मिनिटे 19 सेकंदांनी यान पृथ्वीच्या 235 किलोमीटर गुणिले 19,500 किलोमीटरच्या कक्षेत स्थापित करण्यात आले हेते. सुमारे 4 महिन्यांनी आदित्य एल1 हे 15 लाख किलोमीटर अंतरावरील लॅगरेंज पॉइंट-1 पर्यंत पोहोचणार आहे. या पॉइंटवर ग्रहणाचा प्रभाव पडत नसल्याने तेथून सूर्यासंबंधी संशोधन सहजपणे करता येणार आहे.