सौर मोहिमेची प्रक्षेपण तालीम पूर्ण : 2 सप्टेंबरला श्रीहरिकोटा येथून उड्डाण
वृत्तसंस्था/ बेंगळूर
चांद्रयान-3 च्या यशाने खूश झालेल्या देशवासियांना इस्रो लवकरच आणखी एक आनंदवार्ता देण्याची तयारी करत आहे. इस्रो आपली पहिली सौर मोहीम ‘आदित्य-एल1’ शनिवार, 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करणार आहे. ‘आदित्य-एल1’ ने सुसज्ज भारताचे प्रक्षेपण वाहन लाँचिंग पॅडवर पोहोचले आहे. नुकतेच इस्रोने त्याचे फोटोही शेअर केले आहेत. ‘आदित्य-एल1’ हे विविध राष्ट्रीय संस्थांच्या भागिदारीत पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने विकसित केले गेले आहे.
‘आदित्य-एल1’ अंतराळयान सौर कोरोनाच्या दूरस्थ निरीक्षणासाठी आणि पृथ्वीपासून अंदाजे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-1 (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जियन पॉईंट) वर सौर वाऱ्याच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. नुकतीच ‘आदित्य-एल1’ची प्रक्षेपण तालीम आणि रॉकेटची अंतर्गत तपासणी पूर्ण झाली आहे. हे यान 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटा तळावरून प्रक्षेपित होणार आहे. इस्रोने सूर्य निरीक्षणासाठी प्रक्षेपित केलेली ही पहिली समर्पित भारतीय अंतराळ मोहीम असेल. अंतराळयान म्हणजेच सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा पीएसएव्ही-सी57 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाईल.
‘आदित्य-एल1’ मोहिमेचा उद्देश एल-1 भोवतीच्या कक्षेतून सूर्याचा अभ्यास करणे आहे. हे अंतराळयान फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थर, कोरोनाचे वेगवेगळ्या वेव्ह बँडमध्ये निरीक्षण करण्यासाठी सात पेलोड्स घेऊन जाईल. चार महिन्यांच्या प्रवासादरम्यान ही मोहीम 15 लाख किलोमीटरचे अंतर कापणार आहे.









