श्रीहरिकोटामधून यशस्वी उड्डाण : अवकाशयान 125 दिवस करणार मार्गक्रमण
► वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
सूर्यमोहीम ‘आदित्य-एल1’ हे शनिवारी इस्रोने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) ही दुसरी मोहीम आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून शनिवारी सकाळी 11:50 वाजता ‘आदित्य-एल1’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘आदित्य-एल1’ प्रक्षेपित केले. पुढील चार महिने अंतराळात प्रवास केल्यानंतर ते सूर्याजवळील लॅग्रेज पॉइंट-1 या निश्चित ठिकाणी पोहोचेल. यादरम्यान भारताचे ‘आदित्य’ अवकाशयान 125 दिवसात 15 लाख किलोमीटरचा प्रवास करेल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली. यादरम्यान त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
ध्रुवीय उपग्रह पीएसएलव्ही-सी57 च्या मदतीने ‘आदित्य-एल1’ पृथ्वीवरून रवाना करण्यात आले आहे. इस्रोने पृथ्वीच्या सर्वात खालच्या कक्षेत वेगवेगळ्या स्तरांच्या विभक्तीनंतर प्रथम सूर्यमोहीम स्थापित केली आहे. यानंतर भारताचा ‘आदित्य-एल1’ पुढील 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहील. त्यानंतर ते हळूहळू पृथ्वीच्या इतर कक्षांमध्ये ऑन-बोर्ड प्रोपल्शन वापरून पाठवले जाईल. पाच फेऱ्या मारल्यानंतर ते पृथ्वीच्या गुऊत्वाकर्षण क्षेत्रातून पुढे पाठवले जाईल. 400 कोटी ऊपयांचे बजेट असलेला हा प्रकल्प सूर्याचा कोरोना थर, त्याचे वातावरण, एल-1, सूर्याची किरणे, त्याची भूत-भविष्यातील स्थिती आदींचा अभ्यास करणार आहे.
125 दिवसांचा प्रवास
पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यानंतर त्याचा क्रूझ टप्पा सुरू होईल, असे इस्रोकडून सांगण्यात आले. ‘आदित्य-एल1’चा एकूण प्रवास 125 दिवसांचा आहे. 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिल्यानंतर भारताची सूर्य मोहीम लॅग्रेंज पॉईंट-1 च्या दिशेने जाईल. भारताचा ‘आदित्य-एल1’ पुढील 109 दिवस खूप वेगाने पुढे जाईल. यानंतर, मोठे वक्र आणि यू-टर्नच्या मदतीने, सूर्य मिशन एल-1 पॉईंटच्या प्रभार कक्षेत स्थापित केले जाईल. निश्चित स्थळापर्यंत पोहोचायला आजपासून सुमारे चार महिने लागतील. भारताच्या सूर्य मोहिमेचा प्रवास जानेवारीच्या मध्यात संपणार आहे. त्यानंतर इस्रोला फेब्रुवारी अखेरपर्यंतच संशोधन कार्य सुरू ठेवता येणार आहे.
पंतप्रधानांकडून अभिनंदन : ‘संपूर्ण मानवतेचे कल्याण…’
देशातील पहिल्या सूर्य मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ‘संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी अवकाशाची अधिक चांगली समज विकसित करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ अथक प्रयत्न सुरूच ठेवतील’ असे ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधानांनी लिहिले आहे. पुढे ‘भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल आमचे शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचे अभिनंदन’ असेही ट्विट त्यांनी केले.
आता ‘एक्स-रे पोलारिमीटर’ उपग्रह प्रक्षेपणाची तयारी
भारत लवकरच एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याच्या तयारीत आहे. एक्स-रे ध्रुवीय मीटर उपग्रहाद्वारे खगोलशास्त्रातील अत्याधुनिक वैज्ञानिक समज वाढवण्याच्या उद्देशाने इस्रो ही मोहीम राबवणार आहे. एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह हे अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत चमकदार खगोलीय एक्स-रे स्त्राsतांच्या विविध गतिशीलतेचा अभ्यास करण्यासाठी हे भारताचे पहिले समर्पित ध्रुवीय मिशन आहे. एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज असल्याचे इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कृष्णविवर, न्यूट्रॉन तारे, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, पल्सर विंड नेब्युला यासारख्या विविध खगोलीय स्रोतांमधून उत्सर्जनाची यंत्रणा जटिल भौतिक प्रक्रियांमधून समजून घेण्याच्या अभ्यासाला या मोहिमेतून गती मिळणार आहे.









