प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू, इस्रो शास्त्रज्ञांकडून श्री व्यंकटेश्वर मंदिरात पूजा
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
चांद्रयान-3 च्या यशाने खूश झालेल्या देशवासियांना इस्रोकडून आज शनिवारी आणखी एक आनंदवार्ता मिळणार आहे. भारताच्या पहिल्या सौर मिशन ‘आदित्य-एल1’साठी उलटी गिनती सुरू झाल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी दिली. याचदरम्यान इस्रोच्या शास्त्रज्ञांची एक टीम ‘आदित्य-एल1’ मिशनच्या मिनी मॉडेलसह तिऊमला येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात पूजा व प्रार्थना करण्यासाठी दाखल झाली होती.
भारताची पहिली सौर मोहीम ‘आदित्य-एल1’ शनिवार, 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाईल. रॉकेट आणि उपग्रह सज्ज असून आम्ही प्रक्षेपणापूर्वी सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे. शुक्रवारपासून ‘आदित्य-एल1’चे काउंटडाऊन सुरू झाले आहे. अंतराळयान म्हणजेच सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा पीएसएव्ही-सी57 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाईल.
‘आदित्य-एल1’ हे विविध राष्ट्रीय संस्थांच्या भागिदारीत पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने विकसित केले गेले आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर ‘आदित्य-एल1’ या अंतराळयानाला एल-1 बिंदूवर घेऊन जाईल. एल-1 हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का म्हणजेच 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर 15 कोटी किलोमीटर आहे. ‘आदित्य-एल1’ हॅलो ऑर्बिटमध्ये एल-1 पॉईंटवर तैनात केले जाईल. या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी ‘आदित्य-एल1’ला 127 दिवसांचा कालावधी लागणार आहे. या प्रवासादरम्यान अवकाशयानाला दोन मोठ्या ऑर्बिटमधून जावे लागत असून ते टप्पे आव्हानात्मक मानले जातात.
पुन्हा भारताकडे जगाची नजर
‘आदित्य-एल1’ च्या यशस्वी उ•ाणाकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागलेले आहे. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे यशस्वी ‘सॉफ्ट लँडिंग’ करून इस्रोने नुकताच इतिहास रचला असतानाच आता सूर्यमोहीम हाती घेतल्याने भारताकडे जगाची नजर लागलेली आहे. ‘आदित्य-एल1’ मोहीम ही सूर्याचे निरीक्षण करणारी इस्रोची पहिली डेडिकेटेड अंतराळ मोहीम असणार आहे. इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट पीएसएलव्ही-सी57 हे ‘आदित्य-एल1’ला पृथ्वीच्या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडणार आहे. त्यानंतर तीन किंवा चार ऑर्बिट मैन्यूवर केल्यानंतर, ते थेट पृथ्वीच्या स्फेयर ऑफ इंफ्लूएंस बाहेर जाईल.
मोहिमेचा उद्देश
‘आदित्य-एल1’ हा अवकाशात सौर वेधशाळा स्थापन करण्याचा भारताचा पहिला प्रयत्न आहे. मुळात अवकाशयान पृथ्वीपासून 800 किमी उंचीवर ठेवण्याची योजना होती. पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करून ‘आदित्य-एल1’ला पॉईंट एल-1 जवळ ठेवण्याची योजना आखण्यात आली. म्हणूनच, या मिशनला ‘आदित्य-एल1’ असे म्हटले जात आहे. सोलर कोरोनाचे निरीक्षण करणे हाच इस्रोच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ‘आदित्य-एल1’ अंतराळयान सूर्याच्या कोरोनाचे दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी आणि सौर वाऱ्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाईन केलेले आहे.









