आता पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतर 22,459 किमी : उद्या 5 सप्टेंबर रोजी पुन्हा कक्षा वाढवली जाणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
देशाच्या पहिल्या सौर मोहीम ‘आदित्य-एल1’ने पृथ्वीभोवतीची पहिली कक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली असून पुढील कक्षेत प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) यासंबंधी माहिती देत उपग्रह पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याची वाटचाल सुरळीत चालू असल्याचे सांगितले. आता पुढील कक्षाबदल मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता होणार आहे.
‘आदित्य-एल1’ या सौर मोहिमेचे 2 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले होते. भारताचे पहिले सौर अवकाशयान सौर-पृथ्वी एल-1 बिंदूवर ठेवून सूर्याच्या बाह्या वातावरणाचा अभ्यास करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. एल-1 बिंदूवर अंतराळयान तैनात केले जाणार असून हे ठिकाण पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. एल-1 बिंदूवरून भारतीय अवकाशयान सूर्याचा अभ्यास करेल. विशेष म्हणजे हे अंतर सूर्य आणि पृथ्वीमधील अंतराच्या केवळ एक टक्का आहे. हा संपूर्ण अभ्यास या अंतरावरून केला जाणार असून त्याचा फायदा जगातील विकसित राष्ट्रांना होणार असल्याचा दावा केला जात आहे.
भारताच्या ‘आदित्य-एल1’ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे यशस्वी ‘सॉफ्ट लँडिंग’ करून इस्रोने नुकताच इतिहास रचला असतानाच आता सूर्यमोहीम हाती घेतल्याने भारताकडे जगाची नजर आहे. ‘आदित्य-एल1’ मोहीम ही सूर्याचे निरीक्षण करणारी इस्रोची पहिली डेडिकेटेड अंतराळ मोहीम आहे. इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट पीएसएलव्ही-सी57 ने ‘आदित्य-एल1’ला पृथ्वीच्या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडले आहे.
मोहिमेचा उद्देश
‘आदित्य-एल1’ हा अवकाशात सौर वेधशाळा स्थापन करण्याचा भारताचा पहिला प्रयत्न आहे. मुळात अवकाशयान पृथ्वीपासून 800 किमी उंचीवर ठेवण्याची योजना होती. पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करून ‘आदित्य-एल1’ला पॉईंट एल-1 जवळ ठेवण्याची योजना आखण्यात आली. म्हणूनच, या मिशनला ‘आदित्य-एल1’ असे म्हटले जात आहे. सोलर कोरोनाचे निरीक्षण करणे हाच इस्रोच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ‘आदित्य-एल1’ अंतराळयान सूर्याच्या कोरोनाचे दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी आणि सौर वाऱ्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाईन केलेले आहे.









