पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी थ्रस्टर फायर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इस्रोने आदित्य एल1 अंतराळयानाला सोमवारी रात्री सुमारे 2 वाजता ट्रान्स लॅग्रेंजियन पॉइंट 1 मध्ये इंसर्ट केले आहे. याकरिता यानाचे थ्रस्टर काही काळासाठी फायर करण्यात आले. ट्रान्स-लॅग्रेंजियन पॉइंट 1 इंसर्टेशन म्हणजेच यानाला पृथ्वीच्या कक्षेतून लॅग्रेंजियन पॉइंट 1 च्या दिशेने पाठविण्यात आले. येथून अंतराळयान स्वत:चा 15 लाख किलोमीटर अंतराचा प्रवास सुरू करणार आहे. आदित्य 110 दिवसांनी जानेवारी 2024 मध्ये एल1 पॉइंटवर पोहोचणार आहे.

आदित्य एल1 ला 2 सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही-सी57 च्या एक्सएल वर्जन रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले होते. प्रक्षेपणाच्या 63 मिनिटे 19 सेकंदांनी यानाला पृथ्वीच्या 235 किमी गुणिले 19500 किलोमीटरच्या कक्षेत स्थापित करण्यात आले होते. यानंतर 4 वेळा यानाचे थ्रस्टर फायर करत त्याची कक्षा वाढविण्यात आली होती.
आदित्य एल1 ने शास्त्राrय डाटा जमविण्यास सुरु केल्याचे इस्रोकडून सोमवारी सांगण्यात आले होते. यानावरील सुप्रा थर्मल अँड एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर इन्स्ट्रुमेंटला 10 सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून 50 हजार किलोमीटर अंतरावर अॅक्टिवेट करण्यात आले होते. या डाटाच्या मदतीने सूर्यावर निर्माण होणारी वादळे आणि अंतराळातील हवामानाविषयी माहिती मिळू शकणार आहे.









