औंध / फिरोज मुलाणी :
“आयुष्याच्या प्रवासात अनेक संकटे येत होती… मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्याने प्रयत्न करीत राहिलो.. त्यामुळेच यशाचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरलो.” हा प्रेरणादायी प्रवास सांगितला आहे. सातारा येथील डॉ. आदित्य चिंचकर याचा. लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या केंद्रीय आर्किटेक्चर सर्व्हिसेस परिक्षेत सातारा येथील डॉ. आदित्यची केंद्रीय लोकनिर्माण विभाग (ण्.झ्.sं.अ डेप्युटी आर्किटेक्ट श्रेणी एक पदावर निवड झाली. महाराष्ट्रातील फक्त दोन विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश आहे. त्यामध्ये आदित्यने 40 वी रँक प्राप्त केली आहे.
आदित्यने सातारा येथील मोना स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. 2020 मध्ये आर्किटेक्चर पदवीचे शिक्षण प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसेस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथून झाले. पदवीनंतर प्रायव्हेट आर्किटेक्चर फर्ममध्ये तुटपुंज्या पगारावर काम केले. दरम्यान खाजगी क्षेत्रातील नोकरीतील शोषणाला एक वर्षातच वैतागलो होतो. घरची परिस्थिती बेताची असून घरच्यांना विनंती करून गेट आर्किटेक्चर परीक्षेसाठी काही महिने अभ्यास केला. इथेच माझा आर्किटेक्चर व प्लॅनिंग क्षेत्रासाठी स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम झाला होता. 2022 साली परीक्षेत मी संपूर्ण भारतात 48 वी रँक मिळवून खरगपूर आयआयटीत प्रवेश मिळवला. तिथे आर्किटेक्चर व प्लॅनिंगमधल्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाला.
आयआयटीला गुणवत्ता यादीत प्रवेश मिळाल्याने खर्च जास्त नसला तरी घरातील परिस्थिती सामान्य असल्याने मी शैक्षणिक कर्ज घेण्याच्या विचारात होतो. परंतू माझी मावशी मदतीला आली. तिने खर्चाची सर्व जबाबदारी उचलली. या काळात आर्किटेक्चर व प्लॅनिंग शाखेतील वेग वेगळ्या परीक्षा देत राहिलो. 2022 तसेच 2023 साली दिलेल्या परिक्षेत अपयश पदरी पडले. एअरपोर्ट मार्फत घेतलेल्या आर्किटेकपदाच्या भरतीसाठी गेट आर्किटेक्चरचे गुण चांगले असून संधी थोडक्यासाठी हुकली. 2023 चा अखेरीस झालेल्या महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे घेतलेल्या आर्किटेक्चर पद भरतीसाठी माझा रँक 4 असून गुणवत्ता यादीतून बाहेर पडलो. या सर्व कठीण स्थितीत अपयशाने मी तावून सुलाखून निघालो. या संधीचे सोने करायचे अशी खूणगाठ मनाशी बांधली.
2023 ला केंद्रिय लोकनिर्माण विभाग (ण्झ्sंअ मध्ये डेप्युटी आर्किटेक्ट श्रेणी एकसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. आयआयटीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सातारला परतलो. दरम्यानच्या काळात मला चांगल्या नोकरीच्या ऑफर्स येत होत्या. परंतू सरकारी सेवेत जाऊन प्राप्त ज्ञानाचा लोकसेवेसाठी पुरेपूर उपयोग व्हावा अशी माझी कायमची इच्छा होती. त्यामुळे मी घरी राहून अभ्यास करायचे ठरवले. 2024 ला युपीएससीची डेप्युटी आर्किटेक्ट परीक्षेत उत्तीर्ण झालो. मुलाखतीची तयारी केली. देशस्तरावर 40 वी रँक मिळवून मी यशस्वी झालो. मी प्राप्त केलेल्या यशामुळे माझे कुटुंब आनंदी झाले असल्याचे आदित्य याने सांगितले.
- कुटुंबाचा त्याग माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला
घरातला भक्कम पाठिंबा हेच यशाचे लहानपणापासून घरातून चांगले संस्कार झाले, शाळेपासून अभ्यासाचे बाळकडू मिळाले. परिस्थिती बेताची असून घरातील सर्वांनी भक्कम पाठिंबा दिला. आई, वडील, मामा, मावशी खंबीरपणे पाठीशी उभे होते. त्यांचा त्याग माझ्यासाठी मोठा प्रेरणादायी ठरला. जवळपास दोन वर्ष सोशल मीडियापासून मी लांब राहिलो. नियमित अभ्यास, दररोज व्यायाम आणि पोषक आहार घेतला. शारीरिक मानसिक आणि आरोग्य या बाबतीत समतोल राखून अभ्यास केला. त्यामुळे ध्येय साध्य करता आले.
– डॉ. आदित्य चिंचकर








