वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची महिला फुटबॉल गोलरक्षक आदिती चौहानने आपल्या वैयक्तिक 17 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीला निरोप दिला आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाची माजी गोलरक्षक 32 वर्षीय आदिती चौहानने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे.
तब्बल 12 वर्षांपूर्वी युरापमध्ये व्यवसायिक फुटबॉल क्षेत्रात खेळणारी आदिती चौहान ही पहिली भारतीय फुटबॉलपटू म्हणून ओळखली जाते. देशातील युवा नवोदित फुटबॉलपटूंना योग्यवेळी संधी मिळावी या हेतुने आपण निवृत्तीचा निर्णय योग्यवेळी घेतल्याचे आदितीने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या क्षेत्रामध्ये गेली 17 वर्षे आदितीने आपल्या दर्जेदार खेळाचे दर्शन घडविले. भारतीय संघाची ती जागतिक स्तरावरील भक्कम गोलरक्षक म्हणून कार्यरत होती. या क्षेत्रामध्ये आपल्याला अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे सर्वपदाधिकारी त्याच प्रमाणे सहकारी आणि प्रसार माध्यमांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आदितीने सर्वांचे आभार मानले आहेत. निवृत्तीचा निर्णय घेताना मला थोडे दु:ख झाले. पण भारतीय फुटबॉलपटू म्हणून मला नेहमीच अभिमान वाटतो, असेही ती म्हणाली.
आदिती चौहानला ब्रिटनमध्ये वेस्टहॅम युनायटेड फुटबॉल क्लबने खेळण्याची संधी दिली. या संधीने मला आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्राचा थोडाफार अनुभव मिळू शकला. क्रीडा व्यवस्थापनाने आपले विदेशात खेळण्यासाठी मन वळविले. फुटबॉल क्षेत्र निवडल्यानंतर शिक्षण आणि फुटबॉल यांच्यात योग्य समतोलपणा मी शेवटपर्यंत साधले, असेही आदितीने म्हटले आहे. इंग्लंडमध्ये महिलांच्या सुपर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी वेस्टहॅम युनायटेड संघाने आदितीबरोबर करार केला होता. आदितीने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकिर्दीत 57 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2012, 2016 आणि 2019 साली महिलांची सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय फुटबॉल संघामध्ये आदितीचा समावेश होता. या क्षेत्रात वावरताना मला दोनवेळा दुखापतीमुळे काही कालावधीसाठी या क्षेत्रातून अलिप्त रहावे लागले होते, असेही आदितीने सांगितले. आदितीने ब्रिटनमधील महिलांच्या सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या दोन हंगामामध्ये आपला सहभाग दर्शविला होता. 2018 च्या प्रारंभी आदिती मायदेशी परतली. त्यानंतर स्थानिक राष्ट्रीय पातळीवर तिने 2019-20 च्या महिलांच्या फुटबॉल लीग स्पर्धेत गोकुळाम केरळ एफसी संघाचे प्रतिनिधीत्व केले. गोकुळाम केरळ संघाने दोनवेळा महिलांची लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली. तसेच एएफसी महिलांच्या क्लबस्तरीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसरे स्थान पटकाविले. आदितीच्या भक्कम गोलरक्षणामुळे गोकुळाम केरळ संघाला महिलांच्या लीग फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत दोनवेळा विजेतेपद मिळविता आले.









