लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली असताना पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील वाद पुन्हा भडकला आहे. ‘एकवेळ भारतीय जनता पक्षाला मत द्या, पण तृणमूल काँग्रेसला देऊ नका,“ असे आवाहन या राज्यातील बेहरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अधीररंजन चौधरी यांनी तीन दिवसांपूर्वी केले होते. अधीररंजन आणि त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाचे एजंट आहेत, ते विश्वासघातकी आहेत, असा प्रत्यारोप तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी केल्याने दोन्ही पक्षांमध्ये शब्दयुद्ध पेटल्याचे दिसून येत आहे.
तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष विरोधकांच्या आघाडीत समाविष्ट आहेत. परंतु, पश्चिम बंगालमध्ये ही आघाडी नाही, असे ममता बॅनर्जी यांनी काही आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांनी राज्यात काँग्रेसशी युती करण्यास नकार देऊन सर्व 42 जागांवर आपले उमेदवार परस्पर घोषित केले होते. काँग्रेसने त्यांच्याकडे सहा जागा मागितल्या होत्या असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तथापि, एकाही जागेवर युती करण्यास तृणमूल तयार नसल्याने राज्यात भारतीय जनता पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस तसेच डावी आघाडी यांच्यात त्रिकोणी संघर्ष होत आहे. अधीररंजन चौधरी यांच्या विरोधात काँग्रेसने युसूफ पठाण या क्रिकेट खेळाडूला उतरविले आहे. त्यामुळे या मतदारसंघात लक्षणीय संख्येने असणारी मुस्लीम मते यावेळी काँग्रेसला न पडता तृणमूल काँग्रेसकडे जातील, अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत चौधरींची कोंडी होत आहे.
नैराश्यपोटी आवाहन
पराभवाच्या भीतीने चौधरी निराश झाले असून त्या भरात त्यांनी तृणमूलपेक्षा भारतीय जनता पक्षाला मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केला आहे. काँग्रेसने डाव्यांशी युती केली असली तरी, या दोन्ही पक्षांचा प्रभाव गेल्या निवडणुकीतही दिसला नव्हता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर या युतीला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे बेहरामपूर मतदारसंघात काँग्रेसची अडचण होत असून या अडचणीला तृणमूल काँग्रेस जबाबदार आहे, अशी पक्षाची भावना असल्याचे दिसून येते. त्यामुळे अधीररंजन चौधरी यांनी हे विधान केले असावे, असे अनुमान आहे.