पुणे प्रतिनिधी
पुणे- राष्ट्रवादीचा खासदार असलेल्या शिरूरमध्ये पुढील खासदार शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील वक्तव्य शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केलं होत. त्यांनतर राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला होता. मात्र उमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. शिवसेनेत तिकीट देण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे कि खासदार संजय राऊत यांना आहे? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.
सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. असं असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही राऊतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “संजय राऊतांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी ते वक्तव्य केलं असावं. उद्या मी पण जिथं शिवसेनेचा खासदार आहे तिथं जाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून उमेदवार जाहीर करील, पण उमेदवार जाहीर केल्यावर मला तिकीट देण्याचा अधिकार आहे की शरद पवारांना आहे? संजय राऊत यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की उद्धव ठाकरे यांना आहे?” असे पवार म्हणाले.
संजय राऊतयांचं वक्तव्य काय?
शिवससेनेचे खासदार संजय राऊत हे खेडमधील आंबेगाव येथे शिवाजी आढळराव पाटील यांच्या उपस्थित त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राऊत यांनी, “शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा संसदेत दिसतील. लोकसभेत आम्ही दोघं एकत्र बसणार आहोत,
शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे शिवाजी आढळराव पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. आढळरावांनी शिरूर मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी भविष्यात आढळराव हे संसदेत असतील, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो,” असंही संजय राऊत म्हणाले होते.
सध्या राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून सलग दोनदा शिवसेनेचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र, यंद्याच्या (२०१९) लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव करत शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. शिरुर मतदारसंघातील एकूण १२ लाख ८६ हजार २२६ मतांपैकी अमोल कोल्हे यांना ४९.१७ टक्के मते मिळाली होती. २३ उमेदवार उभे असणाऱ्या या मतदारसंघातील जवळजवळ ५० टक्के म्हणजेच ६ लाख ३२ हजार ४४२ मते कोल्हे यांना मिळाली होती. कोल्हे यांचे प्रमुख विरोधक असणाऱ्या अढळराव पाटील यांना ४४.६४ टक्के म्हणजेच ५ लाख ७४ हजार १६४ मते मिळाली होती. कोल्हे यांनी ५८ हजार २७८ मतांनी आढळराव यांचा पराभव केला होता.








