केरळमधील राजकारण तापले : काँग्रेस-डाव्यांकडून परस्परांवर टीका
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये आयपीएस अधिकारी आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एम.आर. अजित कुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याची भेट घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. आता अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी संघ पदाधिकाऱ्याच्या भेटीसंबंधी स्पष्टीकरण दिले असून त्यावरूनही वाद झाला आहे. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफने याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
अजित कुमार यांना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे निकटवर्तीय मानले जाते. अजित कुमार यांनी मागील वर्षी मे महिन्यात त्रिशूरमध्ये संघ महासचिव दत्तात्रेय होसबाळे यांची भेट घेतली होती. आता याप्रकरणी वाद झाल्यावर अजित कुमार यांनी ही भेट वैयक्तिक स्वरुपाची होती असे स्पष्टीकरण दिले आहे. अजित कुमार यांनी त्रिशूरमध्ये भाजप उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीत विजय सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री आणि संघ यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर सत्तारुढ माकपने काँग्रेसचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
तर डाव्या आघाडीतील दुसरा सर्वात मोठा पक्ष भाकपने एडीजीपी अन् संघ पदाधिकाऱ्याच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस अधिकारी आणि संघ पदाधिकाऱ्याच्या कथित भेटीमुळे लोकांमध्ये संशय निर्माण होत असल्याचे भाकपने म्हटले आहे.
कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एडीजीपीने संघाची शाखा विज्ञान भारतीच्या संघटनात्मक नेत्यांसोबत कोणती चर्चा केली होती? या भेटीमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न राज्याचे लोक निश्चितच करतील असे वक्तव्य भाकपचे राज्य सचिव बिनॉय विश्वम यांनी केले आहे.
काँग्रेस नेत्यांकडून प्रश्नचिन्ह
काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी एडीजीपीच्या कथित स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संघ ही एक अशी संघटना आहे जी एलडीएफ आणि यूडीएफ दोघांचीही विरोधक आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधीन एका आयपीएस अधिकाऱ्याने अशा संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्याची भेट घेतली होती. त्यांनी या भेटीपूर्वी मुख्यमंत्री किंवा पोलीस महासंचालकांना कळविले होते का? याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची गरज असल्याचे मुरलीधरन यांनी म्हटले आहे. तर एडीजीपी अजित कुमार हे माकप नेते नसल्याने पक्षाने यावर स्पष्टीकरण का द्यावे असे डाव्या पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे.









