तिन्ही जिल्ह्यांच्या विकास आढावा बैठकीत कामगारमंत्री संतोष लाड यांच्याकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
बेळगाव : कामगार खात्याकडे बोगस बांधकाम कामगारांची झालेली नोंद, अधिकाऱ्यांकडून सेस वसूल करण्याकडे झालेले दुर्लक्ष, ठोस माहितीचा अभाव यामुळे कामगार खात्याचे मंत्री संतोष लाड यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती केली. चांगले काम करा व माझ्या खात्याची लाज राखा, असे म्हणत अधिकाऱ्यांना व्यवस्थित काम करण्यासाठी हात जोडले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार खात्याच्या बेळगाव, हुबळी-धारवाड व हावेरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये कामगार खात्याकडून कामगारांसाठी राबविलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कामगार खात्याचे मंत्री संतोष लाड यांनी कामगार खात्याच्या कार्यदर्शींचाही बैठकीत पानउतारा केला.
कामगार खात्याकडून बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. तसेच अनेक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे कामगार खात्याकडे मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांची नोंद होत आहे. यामध्ये बोगस कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. तर कामगारांसाठी महानगरपालिकांच्या व्याप्तीत होणाऱ्या बांधकामानंतर मिळणारा सेस कितपत उपलब्ध होतो, याची माहिती मंत्र्यांनी जाणून घेतली. मात्र याबाबत अधिकाऱ्यांकडून ठोस माहिती देण्यात आली नाही. सेस मिळविण्यात अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याने सर्व जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. इतके काम होत नसेल तर झोपला आहात का? असा सवाल करून अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा समाचार घेतला.
हावेरी जिल्ह्यात बोगस कामगारांची अधिक नोंद
हावेरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस कामगारांची नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात यावी. योग्य असणाऱ्यांनाच योजनेचा लाभ करून द्यावा, अन्यथा कार्डे रद्द करण्यात यावीत, अशी कडक सूचना केली. येत्या दोन महिन्यांत याचा अहवाल देण्याचा आदेश जारी केला. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कामगार नोंदणी बंद ठेवण्याचा आदेशही जारी केला. अशाचप्रकारे इतर जिल्ह्यांमध्येही याची शहानिशा करून अहवाल द्यावा, असे सांगण्यात आले. हावेरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून कोणतीही विचारपूस न करता कामगारांची नोंद केली आहे. यामुळे काही घरांमध्ये संपूर्ण कुटुंबांची नोंद झाली आहे. यामुळे मंत्रीही चक्रावले. 3 लाख कामगारांची नोंद झाल्याचे ऐकून मंत्री संतोष लाड यांनी डोक्याला हात लावला. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा कळस झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. व्यावसायिकांची नेंदणी करण्याचा आदेश कामगार खात्याकडून जारी करण्यात आला होता. मात्र यामध्येही अनेक अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखविल्याचे निदर्शनास आले. नोंदणीसंदर्भात जनजागृती करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आल्याने चांगलाच समाचार घेतला.
कामगार खात्याच्या सचिवांचाही पानउतारा
तिन्ही जिल्ह्यांतील कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित माहिती देण्यात आली नसल्याने मंत्र्यांनी कामगार खात्याच्या सचिवांचाही भर बैठकीत पानउतारा केला. अधिकाऱ्यांना खडसावून सांगण्याची सूचना केली. भविष्यामध्ये योग्यप्रकारे काम करून कामगार खात्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी सूचना केली. बैठकीत शिस्त न पाळलेल्या अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. झालेल्या कामांची तातडीने माहिती द्यावी, अशी सूचना केली. यावेळी कामगार खात्याचे मुख्य कार्यदर्शी मोहम्मद मोहसीन, कामगार आयुक्त गोपालकृष्ण, बांधकाम आणि इतर निर्माण कामगार मंडळाचे सीईओ भारती, सहकामगार आयुक्त व बॉयलर खात्याचे संचालक श्रीनिवास आदी उपस्थित होते.









