प्रतिनिधी /पणजी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे जाहीर संबोधन आज शनिवार दि. 7 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता कांपाल-पणजी येथील भाऊसाहेब बांदोडकर फुटबॉल मैदानावर होणार आहे. आरएसएसची राष्ट्रीय बैठक गेल्या तीन दिवसापासून नागेशी फोंडा येथे झाली. त्यानंतर गोव्यातील स्वयंसेवक निमंत्रित गोमंतकीय यांच्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत भागवत मार्गदर्शन करणार असून विविध विषयांवर आपली मते मांडणार आहेत. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी चालू असून राज्यातील गावागावातून त्याचे निरोप देण्याचे, पोहोचवण्याचे काम चालू आहे. सभेच्या ठिकाणी एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्यात गोवा राज्याचा सामाजिक, सांस्कृतिक, इतिहास, देशातील राष्ट्रभक्तांनी गोवा मुक्तीसाठी दिलेले योगदान याची सचित्र माहिती समाविष्ट आहे. त्याशिवाय पुस्तकांचा एक स्टॉलही तेथे लावण्यात आला असून त्यात राष्ट्रीय विचारांच्या साहित्य समावेश करण्यात आला आहे. गो-शाळेचा स्टॉलही तेथे देण्यात आला असून त्यात गो-उत्पादन मिळणार आहे.
यावेळी स्वयंसेवकांचे व्यायाम, योग, प्रात्याक्षिके, सांघिक गीत यांचे सादरीकरण होणार आहे. सरसंघचालकांचे हे बौधिक मार्गदर्शन असून कर्णबधीरांना खुणांच्या भाषेत ते ऐकण्याची सोय तेथे करण्यात आली आहे. मोहनजी भागवत हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोव्यात असून त्यांचे विचार एwकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.









