हुबळी-धारवाड औद्योगिक क्षेत्राला होणार पुरवठा
बेळगाव : कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्डाने हुबळी-धारवाड येथील औद्योगिक क्षेत्राला हिडकल जलाशयातील पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी जलवाहिनी घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र गोकाक, बैलहोंगल तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना याबाबतची कोणतीही नोटीस न देता उभ्या पिकांतून जलवाहिनीसाठी खोदाई करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार की वाऱ्यावर सोडणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
शहराला हिडकल आणि राकसकोप जलाशयांतून पाण्याचा पुरवठा केला जातो. हिडकल जलाशयावर बेळगावसह संकेश्वर आणि हुक्केरी शहराचा भार आहे. त्यातच आता हिडकल जलाशयातून हुबळी आणि धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकीकडे शहरातील काही भागामध्ये आठवड्याआड एकदा पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. तर दुसरीकडे हिडकल जलाशयातील पाण्याचा पुरवठा हुबळी आणि धारवाड औद्योगिक क्षेत्राला करण्यासाठी धडपड सुरू आहे.
हिडकल जलाशयात पाणीटंचाईची शक्यता
हिडकल जलाशयातून बेळगाव, संकेश्वर आणि हुक्केरी शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे जलाशयात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. हिडकल परिसरातील उद्योग निवासी क्षेत्र आणि शेतजमिनीला पुरेसा पाण्याचा पुरवठा होत नाही. मात्र या जलाशयातील पाणी हुबळी आणि धारवाड औद्योगिक क्षेत्राकडे नेण्याची योजना आखली आहे. –









