महामार्ग प्राधिकरणाकडून शुल्कात 3 ते 5 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेसाठीचे मतदान संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विविध राज्यांमध्ये आकारण्यात येणाऱ्या टोलचे नवे दर जाहीर केले आहेत. टोलचे नवे दर सोमवारपासून लागू होणार आहेत. प्राधिकरणाने रविवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये यासंबंधीची अधिसूचना प्रकाशित करत याची माहिती दिली आहे.
टोल शुल्क दरवर्षी नव्याने निश्चित केले जाते. घाऊक महागाई निर्देशांकानुसार टोलचे दर कमी किंवा अधिक केले जात असतात असे महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे. महामार्ग प्राधिकरणाने टोल दर दोन महिन्यांपूर्वीच वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक पार पडल्यावर नव्या शुल्काप्रमाणे टोल आकारण्याची सूचना केली होती.
3 जूनपासून सुमारे 1100 टोलनाक्यांवर नव्या दराप्रमाणे टोल आकारण्यात येणार आहे. भारताने मागील काही वर्षांमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे जाळे वाढविण्याठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे आता राष्ट्रीय महामार्गाची लांबी 1 लाख 46 हजार किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. भारत आता राष्ट्रीय महामार्गांप्रकरणी जगात दुसऱ्या स्थानावर आहे.
जवळपास 1100 टोलनाक्यांवर सोमवारपासून टोल रक्कम 3-5 टक्क्यांनी वाढविण्याची योजना आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने सुधारित दर लागू करण्यात येतील असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. टोल दराचा मुद्दा मागील काही वर्षांमध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरला आहे. टोल आकारणी ही रस्ते प्रकल्प विकसित करण्यासाठी आवश्यक असल्याचे प्राधिकरणाचे सांगणे आहे. तर टोलद्वारे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत असल्याची विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येते.