कोल्हापूर :
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशासह इतर राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री जोर्तिलिंग देवाची यात्रा 12 एप्रिल रोजी संपन्न होत आहे.या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 11 ते 14 एप्रिल या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
जोतिबा यात्रेचा कालावधी 11 ते 12.04.2025 असा आहे. 13 एप्रिल रोजी पहिली पाकाळणी यात्रा आहे. त्यामुळे 11 ते 14 एप्रिल या कालावधीत यात्रेसाठी जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर विभागाने 150 बसेसचे नियोजन केले आहे. तसेच सांगली, सातारा, सोलापूर व पुणे विभागामार्फतही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व प्रमुख बसस्थानकावरुन जोतिबा डोंगर अशी थेट सेवा उपलब्ध करण्यात आलेली असून, अधिक माहितीसाठी नजिकच्या बसस्थानकाशी भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जोतिबा यात्रेसाठी मध्यवर्ती बसस्थानक कोल्हापूर, जोतिबा डोंगर व पंचगंगा घाट या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपाचे यात्रा शेड उभारणेत आले आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसस्थानकावर क्यु रेलींग उभारण्यात आलेली आहेत. तसेच भाविक प्रवाशांच्या सोईसाठी जोतिबा बसस्थानक आणि पंचगंगा बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय करणेत आलेली आहे. या शिवाय .बस मार्गस्थ बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्तीसाठी यांत्रिक कर्मचारी, ब्रेक डाऊन अटेंड वाहने (दुरुस्तीसाठीच्या अत्यावश्यक साहीत्यासह) उपलब्ध ठेवण्यात आलेली आहेत.मध्यवर्ती बसस्थानक कोल्हापूर, पंचगंगा बसस्थानक कोल्हापूर, जोतिबा बसस्थानक जोतिबा डोंगर येथून दर 5 मिनीटाला बस फेरीचे नियोजन करण्यात आले आहे.








