उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांची माहिती
बेंगळूर : एअरबस-320 सारख्या मोठ्या विमानांच्या संचालनासाठी आणि रात्रीच्या वेळी लँडिंग सुविधा निर्माण करण्यासाठी विजापूर ग्रीनफिल्ड विमानतळाच सुसज्ज बनविण्यात येणार आहे. या कामासाठी अतिरिक्त 270.83 कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री व विजापूर जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली आहे. अतिरिक्त अनुदानातून विमानळाच्या विकासाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने खर्च एकूण 618.75 कोटी रुपयांपर्यंत जाईल. केवळ एटीआर प्रकारच्या नागरी विमानांच्या संचालनापुरती असणारी विमानतळाची मूळ रचना बदली जाणार आहे. एअरबस-320 सारख्या विमानांच्या संचालनाची क्षमता निर्माण केली जाणार आहे. यामुळे खर्चात वाढ होणार आहे, असेही मंत्री एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले.
विजापूर विमानतळाची मूळ रचना केवळ लहान प्रवासी विमाने विचारात घेऊन करण्यात आली होती. त्यात एअरबस प्रकारच्या विमानांच्या संचालनाचा किंवा रात्री विमानांच्या लँडिंगची व्यवस्था नव्हती. मात्र, विजापूर आणि बागलकोटसह उत्तर कर्नाटकातील जिल्हे वेगाने विस्तारत आहेत. सोलापूर, सातारा हे महाराष्ट्रातील जिल्हे देखील विजापूरपासून जवळ आहेत. बेळगाव, बागलकोट जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा विजापूरशी संपर्क वाढला आहे. त्यामुळे पुढील 50 वर्षांचा विचार करून येथील विमानतळावर अतिरिक्त सुविधा निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.









