गोळी झाडून घेत संपविले आयुष्य
वृत्तसंस्था/ सुनारिया
हरियाणातील अतिरिक्त पोलीस महासंचालक स्तरीय अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह घरातच आढळून आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. या अधिकाऱ्याची पत्नी आयएएस अधिकारी अमनपीत आहेत. त्या सध्या एका शिष्टमंडळासोबत जपानच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. मृत अधिकारी वाय. पूरन कुमार हे चंदीगड सेक्टर 11 च्या शासकीय निवासस्थानात राहत होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक पूरन कुमार हे सध्या पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात सेवा बजावत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस फॉरेन्सिक टीमसोबत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पूरन कमुरा हे 2001 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी होते. पूरन कुमार यांनी सोमवारीच एका गनमॅनकडून बंदूक घेतली होती. तर मंगळवारी पूरन कुमार यांची मुलगी तळघरात पोहोचली असता तिला पूरन कुमार हे जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. मुलीने त्वरित लोकांना घटनेची माहिती दिली.









