तीर्थक्षेत्र विकास आराखड्य़ांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी : मंदिर परिसरासह दर्शन रांग, गोपाळकृष्ण मंदिर, 65 एकर आदी भागांनाही दिल्या भेटी
प्रतिनिधी/पंढरपूर
श्रीक्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ, पालखी मार्ग विकास आराखड्य़ांतर्गत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, पंढरपूर शहर येथे वारकरी, भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कामांची पाहणी सामान्य प्रशासनच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केली. यावेळी अपर मुख्य सचिव सौनिक यांनी मंदिर, पददर्शन रांग, मुखदर्शन रांग, विठ्ठल-रुक्मिणी सभामंडप, दर्शनमंडप, नामदेव पायरी, होळकर वाडा, शिंदे सरकार वाडा, गोपाळ कृष्ण मंदिर, यमाई तलाव, 65 एकर परिसर येथील पाहणी केली.
तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ांतर्गत पत्रा शेड येथे नव्याने दर्शन मंडप प्रस्तावित केला असून हा दर्शनी मंडप सर्व सुविधांयुक्त व अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहे. यामध्ये भाविकांना आवश्यक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरेचे व मूळ वस्तूचे जतन करून पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येत असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव व वास्तू विशारद तेजस्विनी आफळे यांनी दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाचे विशेष कार्य अधिकारी राजेश तितर, नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त आशिष लोकरे, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.
गोपाळपूर येथेही करण्यात येणार सुविधा
आषाढी आणि कार्तिकी यात्रेनिमित्त गोपाळपूर येथे गोपाळकृष्ण मंदिरात पौर्णिमेदिवशी गोपाळकाला केला जातो. यादिवशी मोठय़ा प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी होते. येणाऱया भाविकांना सुविधा देण्यासाठी गोपाळकृष्ण मंदिराचा विकास करण्यात येणार आहे. तसेच पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सौनिक यांना दिली.