गणेशोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी पाऊल
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचे अतिरिक्त कॅमेरे बसविण्यात येत आहेत. खासकरून वर्दळीचे ठिकाण व मिरवणूक मार्गावर अतिरिक्त कॅमेरे बसविण्याचे काम पोलीस दलाने हाती घेतले आहे. मार्केट, खडेबाजारसह शहरातील बहुतेक पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस दलाच्यावतीने याआधीच कॅमेरे बसविले आहेत. प्रत्येक पोलीस स्थानकातील स्क्रीनवर या कॅमेऱ्यांचे फुटेज पाहता येते.आता खासकरून गणेशोत्सवासाठी अतिरिक्त कॅमेरे बसविण्यात येत आहेत.150 हून अधिक कॅमेरे नव्याने बसविण्याचे काम सुरू उपलब्ध माहितीनुसार एका खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 150 हून अधिक कॅमेरे नव्याने बसविण्याचे काम सुरू आहे. सध्या बाजारपेठेत नागरिकांनी बसविलेल्या 4 हजारहून अधिक कॅमेऱ्यांची माहिती पोलीस दलाकडे आहे. गरज पडल्यास या कॅमेऱ्यांचे फुटेजही पोलीस दल घेणार आहे.
गणेश मंडपातही कॅमेरे बसविण्याची सूचना
केवळ गणेशोत्सवासाठी खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 150 हून अधिक ठिकाणी नवे कॅमेरे बसविण्यात आले असून, खडेबाजार पोलीस स्थानकात त्याचे फुटेज पाहता येणार आहेत. याबरोबरच सर्व गणेश मंडपातही कॅमेरे बसविण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळांना केली आहे. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा, कोणीही या काळात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, खबरदारी घेऊनही एखादी अप्रिय घटना घडलीच तर सीसीटीव्ही फुटेजवरून सहजपणे यासंबंधीची माहिती पोलीस दलाला मिळावी, यासाठी अतिरिक्त कॅमेरे बसविण्यात येत आहेत.