प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनचा निर्णय : प्रवास सुखकर होणार
बेळगाव : शक्ती योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या महिलांच्या मोफत बसप्रवासाला प्रचंड प्रतिसाद वाढला आहे. 11 जूनपासून महिलांना मोफत प्रवास दिला जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सार्वजनिक बस व्यवस्थेवर ताण वाढला आहे. दरम्यान, परिवहनने काही ठिकाणी बसफेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वत्र महिलांना मोफत बसप्रवास सुरू असल्याने धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसेसना प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. यासाठी परिवहनने निपाणी, गोकाक, धारवाड, चिकोडी आणि विजापूर मार्गावरदेखील जादा बस सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवास सुखकर होणार आहे.
मागील आठवड्याभरात महिलांच्या संख्येत प्रचंड संख्येने वाढ झाली आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही मार्गावर जादा बस फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. विविध मार्गावर प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे बेळगाव विभागाच्या महसुलात वाढ झाली आहे. महिलांना मोफत प्रवास असला तरी एकूण उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे परिवहनला काहीसा दिलासा मिळाला आहे. स्थानिक बसफेऱ्यादेखील वाढविण्यात आल्या आहेत. वडगाव, अनगोळ, मजगाव, काकती, होनगा, येळ्ळूर आदी ठिकाणी सायंकाळच्या वेळेत बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. गर्दी असलेल्या ठिकाणी बसफेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसफेऱ्या वाढवून बससेवा सुरळीत करण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र बसचालक, वाहक आणि बसेसची कमतरता असल्याने नियोजन करताना दमछाक होऊ लागली आहे. महिलांची संख्या वाढल्याने सार्वजनिक बसवाहतुकीवर ताण वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी बसफेऱ्या वाढविल्या जात आहेत.
गर्दीच्या ठिकाणी बसफेऱ्या वाढविणार
लांब पल्ल्यासाठी विविध मार्गावर जादा बसेस सोडल्या जात आहेत. त्याबरोबर स्थानिक ठिकाणी सायंकाळच्या वेळेत बसफेऱ्या वाढविल्या जात आहेत. बसेस, ड्रायव्हर, वाहकांची तडजोड करून बसफेऱ्या पाठविल्या जात आहेत. विशेषत: गर्दी असलेल्या ठिकाणी बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहेत.
– ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)









